नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या तक्रारींचे निवारण व कामे जलदगतीने होण्यासाठी महापालिकेतील सर्व खातेप्रमुखांच्या कार्यालयांची पुनर्ररचना केली जाणार आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनी यासंबंधीची बैठक गुरुवारी महापालिकेत घेतली. नागरिकांशी संबंध येणारी सर्व खाती व संबंधित खातेप्रमुखांची कार्यालये आता महापालिका मुख्य भवनात एकत्र केली जाणार आहेत.
नागरिकांशी संबंध येणाऱ्या सर्व खातेप्रमुखांची कार्यालये व त्यांची आसनव्यवस्था एकाच ठिकाणी असेल, तर नागरिकांच्या दृष्टीने ते सोईचे होईल यासाठी मुख्य भवनातील कार्यालयांची रचना आता बदलली जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी हा बदल केला जाणार आहे. या खातेप्रमुखांची कार्यालये व त्यांची आसनव्यवस्था एकाच ठिकाणी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात करावी, असा आदेश आयुक्तांनी दिला आहे.
कार्यालयीन आसन व्यवस्थेसंबंधीच्या बैठकीला आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, राजेंद्र जगताप, नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह खातेप्रमुख, उपायुक्त व सह महापालिका आयुक्त उपस्थित होते. नागरिकांशी संबंधित खात्यांची कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असू नयेत, तसेच खातेप्रमुखांची एकापेक्षा अधिक कार्यालये असण्याऐवजी ती एकाच ठिकाणी एकत्रित असावीत, असे आयुक्तांनी या वेळी सांगितले.
ई मेल, वॉटस् अॅपवरून निर्णय घ्या
माहिती तंत्रज्ञानास अनुसरून सर्व खातेप्रमुख आणि विभाग प्रमुखांनी तत्परतेने निर्णय घेणे अपेक्षित असून तातडीने उत्तरे देण्याची, तसेच तक्रार अर्जावर अथवा कागदपत्रांवर प्रकरण निहाय कालमर्यादेत निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करावी, असेही आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. अतिमहत्त्वाच्या कामकाजासंबंधी ई मेल वा वॉटस् अॅप प्रणालीचा वापर करून कार्यवाही करावी, असेही आदेश खातेप्रमुखांना व विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.