बांधकाम प्रकल्प, वॉशिंग सेंटरचा समावेश
पुणे : उन्हाळय़ामुळे पाण्याची मागणी वाढली असतानाच काही भागात पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. बांधकाम प्रकल्पांसाठी आणि वॉिशग सेंटर येथे गाडय़ा धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई होणार असून त्याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जूनपर्यंत नव्याने नळजोड न देण्याचा निर्णयही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.
वाढत्या उन्हामुळे शहरातील पाण्याची मागणी वाढली आहे. शहराला दैनंदिन १ हजार ५०० दशलक्ष लिटर एवढय़ा पाण्याची आवश्यकता असते. मात्र गेल्या महिन्यापासून पाण्याची दैनंदिन मागणी १ हजार ६०० दशलक्ष लिटर एवढी झाली आहे. त्यातच खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणांमुळे ८.८८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे ३०. ४८ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा दोन टीएमसीने कमी असून धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरविणे अपेक्षित आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.
महापालिकेच्या विविध विभागांकडून होणाऱ्या बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाण्याचा वापर करण्याचे आदेश यापूर्वीच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत. त्याला प्रतिसादही मिळत आहे. बांधकाम प्रकल्पातही प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्याची सूचना आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी देतानाच प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करणे बंधनकार करता येईल, याचीही चाचपणी सुरू झाली आहे. गाडय़ा धुण्यासाठी ज्या वॉिशग सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर होतो ती सेंटर बंद करण्यात येणार आहेत. बांधकामांसाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर होत असेल तर त्यावरही कारवाई करण्यात येणार असून महामेट्रोनेही मेट्रो मार्गिकेच्या कामांसाठी भूगर्भातील पाण्याचा वापर करावा, असे पत्र महामेट्रोला देण्यात येणार आहे.