महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षक तसेच शिपाई व रखवालदारांच्या बदल्यांबाबत पालिका प्रशासनाने सपशेल माघार घेतली आहे. शिक्षकांच्या संघटनांनी केलेली आंदोलने, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दादागिरी आणि लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांवर आणलेला दबाव यामुळे बदल्यांबाबत आतापर्यंत खंबीर राहिलेल्या प्रशासनाने आता शिक्षकांना त्यांच्या घराजवळ बदली करून देण्याचे मान्य केले आहे.
शिक्षण मंडळातील सुमारे तेराशे शिक्षक तसेच तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच जागी असलेले शिपाई आणि रखवालदार यांच्या नियमानुसार बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र या बदल्यांना जोरदार विरोध करत शिक्षकांच्या संघटनांनी महापालिकेत आंदोलन सुरू केले. हे आंदोलन म्हणजे दादागिरीचा नमुना होता. रोज महापालिका भवनात जमून घोषणाबाजी, पदाधिकाऱ्यांना घेराव, नगरसेवकांना निवेदने देणे अशा प्रकारे हे आंदोलन चालवण्यात आले. तसेच सर्व नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेणे, ओळखीच्या नगरसेवकाकडून बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न करणे असेही प्रकार सुरू होते. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधी आठ दिवस या प्रकारे आंदोलन चालवण्यात आले. तरीही महापालिका प्रशासनाने ठाम भूमिका घेऊन बदल्या रद्द होणार नाहीत हे वारंवार स्पष्ट केले होते.
नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही बदल्यांच्या विरोधात आंदोलन सुरू राहिले. शाळा सुरू झाल्यानंतरही बदलीच्या ठिकाणी न जाता शिक्षक संघटनांकडून महापालिकेत जमून आंदोलन केले जात होते. आंदोलन सुरू झाल्यानंतर आधीचे चारपाच दिवस महापालिकेतील सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच अनेक नगरसेवकांनी बदल्या रद्द करण्याचे काहीही कारण नाही. बदल्या प्रशासनाने केलेल्या आहेत व त्या नियमानुसारच आहेत. त्यामुळे बदल्यांना विरोध करणार नाही अशी भूमिका घेतली होती.
बदल्यांना विरोध करणार नाही अशी जाहीर भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी खासगीत मात्र वेगळी भूमिका घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिक्षकांच्या बदल्यांना लोकप्रतिनिधींनी मोठा विरोध केल्यामुळे तसेच ज्यांची बदली झाली आहे, त्यांना घराजवळ बदली द्या, अशी मागणी केल्यामुळे अखेर महापालिका प्रशासनानेही बदल्यांबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. बदलीचे ठिकाण रद्द करण्यासाठी आता चार निकष जाहीर करण्यात आले आहेत. अपंगांच्या बदल्या रद्द केल्या जाणार आहेत तसेच ज्यांना काही आजार आहे अशांच्या बदल्या रद्द केल्या जाणार आहेत तसेच जे शिक्षक वा कर्मचारी एका वर्षांच्या आत सेवानिवृत्त होणार आहेत त्यांच्याही बदल्या रद्द केल्या जाणार असून घरापासून लांब अंतरावर ज्यांची बदली झाली आहे, त्यांची बदली रद्द करून ती शेजारच्या प्रभागात केली जाणार आहे.
महापालिकेने जाहीर केलेल्या बदल्यांच्या नव्या धोरणानुसार मंडळातील सर्वच शिक्षक आता शेजारच्या प्रभागात म्हणजे घराजवळच बदली मागणार असून त्यामुळे महापालिका प्रशासनाने नियमानुसार केलेल्या मूळच्या सर्व बदल्या पालिका प्रशासनाला रद्द कराव्या लागणार आहेत.