महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महापालिकेने सकारात्मक पाऊल उचलले असून पालिकेकडून होणारी विविध वस्तूंची खरेदी यापुढे महिला बचत गटांकडून करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. स्थायी समितीने त्यासंबंधीचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला.
स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने गटांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी महापालिकेने करावी असा प्रस्ताव होता. बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याची घोषणा या प्रस्तावामुळे प्रत्यक्षात येईल. बचत गटांकडून महापालिकेसाठी विविध सेवा घेण्याचाही प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
महापालिकेच्या विविध खात्यांकडून आणि विभागांकडून कागद, फाइल्स, कार्यालयांसाठी लागणारी सर्व प्रकारची स्टेशनरी, झाडू, खराटे, फिनेल, स्वच्छतेसाठी लागणी सामग्री, खुर्चीवर ठेवण्याच्या उशा, टेबलक्लॉथ, कापडी पिशव्या, पडदे यासह अनेक वस्तूंची खरेदी ठेकेदारामार्फत केली जाते. यातील अनेक वस्तू बचत गटातील महिलाही तयार करत असल्यामुळे ठेकेदारांमार्फत ही खरेदी न करता बाजारभावाचा विचार करून बचत गटांकडून ही खरेदी करावी, असा हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, अशी माहिती महापालिकेचे अधीक्षक अभियंता आणि मध्यवर्ती भांडार प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी दिली.