लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकात रविवारी सकाळी साडेदहा वाजता ब्रेक निकामी झालेल्या पीएमपी बसने पादचारी आणि एका रिक्षाला धडक दिली. त्यामुळे रस्त्यावर घबराट निर्माण झाली होती. मात्र, बस चालकाने प्रसंगावधान राखत बस सिग्नलच्या खांबावर धडकविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातामध्ये पाच पादचाऱ्यांसह सहा जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमृता प्रसाद पाध्ये (वय ३४), त्यांची मुलगी राधा (वय ७, रा. दोघीही- रेणुकानगरी, शंकरमहाराज मठासमोर, पुणे सातारा रस्ता), रिक्षा चालक आस महंमद कलवा कुरेशी (वय ४५, रा. कासेवाडी), रिक्षातील प्रवाशी अनिल भीमराव डोमाले (वय ४५, रा. पौड रस्ता, कोथरुड), पादचारी करण राठोड (वय २२), परशे गोडसे (वय ४१) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर ते वारजे माळवाडी या मार्गावरील पीएमपी बस लक्ष्मी रस्त्यावरून सकाळी साडेदहाच्या सुमारास निघाली होती. शगुन चौकाच्या अलीकडे बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी शगुन चौकातील सिग्नल सुटला होता. रविवार असल्यामुळे लक्ष्मी रस्त्यावर गर्दी होती.  एलआयसी इमारतीच्या कोपऱ्यावरून अमृता पाध्ये व त्यांची मुलगी, रिक्षावाला हे निघाले होते. ब्रेक निकामी झालेली बस पुढे घेऊन जाणे धोक्याचे असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान दाखवून शगुन चौकाच्या कोपऱ्यात असलेल्या सिग्नलच्या खांबाला बस धडकविली. त्यावेळी बसची पादचारी आणि रिक्षाला धडक बसली.
गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकात अपघात झाल्याचे पाहून घबराट निर्माण झाली. बस सिग्नलच्या खांबाला धडकविल्यामुळे तो खाली पडला. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत, उपनिरीक्षक ए. सी. मनोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातांमध्ये जखमी झालेल्यांना पोलीस व नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल केले. जखमींपैकी रिक्षाचालक कुरेशी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.