पीएमपीची सेवा कार्यक्षम करण्यासाठी कठोर पावले उचलली जात असतानाच चांगले काम करणाऱ्या कामगारांचे आणि अधिकाऱ्यांचे कौतुकही केले जाणार असून यापुढे अशा गौरवासाठी वर्षांतून तीन समारंभ आयोजित केले जाणार आहेत. पीएमपीतर्फे दरवर्षी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी असा गौरव समारंभ आयोजित केला जातो. यापुढे महाराष्ट्रदिनीही असा समारंभ आयोजित केला जाईल.

पीएमपी सेवेत कसूर करणाऱ्यांच्या विरोधात अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांनी सध्या कारवाई सुरू केली आहे. विविध डेपो तसेच यंत्रशाळांना अचानक भेटी दिल्या जात असून त्यातून अनेक गैरप्रकार उघडकीस येत आहेत. पीएमपीच्या अधिकाधिक गाडय़ा मार्गावर आणण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. कामगार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू असतानाच डॉ. परदेशी यांनी प्रजासत्ताकदिनी आयोजित गौरव समारंभात कामगारांचे कौतुकही केले. पीएमपीमध्ये अनेक कामगार चांगले काम करत असल्याचे मला दिसत आहे. अशाच पद्धतीने सर्वानी काम केले पाहिजे. मी प्रत्येक विभागासाठी जे लक्ष्य ठरवून दिले आहे ते साध्य होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. पीएमपीच्या गाडय़ा मार्गावर आणण्यासाठी जे लक्ष्य ठरवून दिले आहे तेही सर्वाना साध्य करावे लागेल, असे आवाहनही डॉ. परदेशी यांनी केले आहे. याच गौरव समारंभात त्यांनी चांगले काम करणाऱ्या कामगारांचे कौतुक करून अशाच प्रकारे चांगले काम करणाऱ्यांचा गौरव महाराष्ट्रदिनी, १ मे रोजी देखील केला जाईल असे सांगितले.
पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ विनाअपघात सेवा करणारे चालक, इंधन वाचवा संदेश देण्यासाठी उपक्रम करणारे सेवक, इमारत भाडे वसुलीचा उच्चांक करणारे कर्मचारी, विविध स्पर्धामध्ये यशस्वी ठरलेले सेवक, यंत्रशाळेत उत्तम कामगिरी करणारे सेवक, प्रवाशांची रक्कम, तसेच अन्य मोलाच्या वस्तू प्रामाणिकपणे परत करणारे सेवक, इतर वाहकांपेक्षा पीएमपीला अधिक उत्पन्न मिळवून देणारे वाहक आदी अनेकांचा गौरव डॉ. परदेशी यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी करण्यात आला.