पुण्याच्या तीन हजार चौरस किलोमीटर क्षेत्राचे नियोजन कसे असावे याचा आराखडा आता केवळ ‘पीएमआरडीए’ (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) तयार करणार नाही. शहरातील काही संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन पुण्याच्या नियोजनासाठीचा ‘नागरिकांचा आराखडा’ तयार करण्याचे ठरवले आहे.
या नागरिकांनी पुण्यातल्या इतरही अभ्यासू कार्यकर्त्यांना गटात सहभागी होण्यासाठी हाक दिली आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते विनय हर्डीकर, शहर नियोजन तज्ज्ञ अनंत अभंग आणि हेमंत साठय़े यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
हा अभ्यास व कृती गट स्थापन करण्यासाठी १७ मे रोजी (रविवार) सकाळी १० ते १२ या वेळात पुणेकरांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजा केळकर संग्रहालयाशेजारी ‘आल्हाद’ इमारतीत हा मेळावा होईल. ‘पुणे महानगर क्षेत्राचे नियोजन म्हणजे ३ हजार चौरस किलोमीटरचे नियोजन असणार आहे. यात राहण्याच्या जागा, व्यापार- उद्योगाची ठिकाणे, बीआरटी, मेट्रो आणि रिंगरोडसारख्या वाहतुकीच्या सुविधा, नवीन नगरपालिका, नगर परिषदा आणि महानगरपालिका, पाणी, वीज, मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या सुविधा, शिक्षण व आरोग्य सुविधा अशा विविध पैलूंचा एकत्रित विचार करावा लागणार आहे. ही मोठी जबाबदारी असून पुणेकरांनी नुसते काठावर बसून बघ्याची भूमिका न घेता नगरविकासाचा सखोल अभ्यास करून विकास आराखडा बनवायला हवा,’ असा मुद्दा या नागरिकांनी मांडला आहे. या मेळाव्यात अभंग यांच्यासह ‘परिसर’ या संस्थेचे सुजित पटवर्धन व रणजित गाडगीळ पुणे महानगर क्षेत्राविषयी माहिती देणार असून त्यानंतर खुली चर्चा होऊन गट स्थापन केला जाईल.
पुणे जिल्ह्य़ाच्या पश्चिम भागात झालेला औद्योगिक वाढीचा असमतोल दूर करून पूर्व बाजूस वाढ करता येईल का, असेही मुद्दे या आराखडय़ात लक्षात घेतले जातील, असे अभंग यांनी सांगितले.

‘शासनातर्फे त्यांचा धोरणात्मक आराखडा तयार केला जाईलच, पण नागरिकांच्या वतीनेही एक आराखडा बनवावा अशी संकल्पना आहे. विधायक व व्यवहार्य सूचना करणाऱ्या अभ्यासू कार्यकर्त्यांची त्यासाठी गरज आहे. पुणेकरांनी आराखडा तयार केल्यावर तो आधी नागरिकांसामोर ठेवला जाईल आणि नंतर पीएमआरडीएलाही सादर केला जाईल.’
– विनय हर्डीकर