चाकण परिसर व मुळशी तालुक्यात दिवसभर भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने पाळत ठेवून रात्रीच्या वेळी चोऱ्या करणाऱ्या सात जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून टेम्पोसह चोरीचा तब्बल ५ लाख ७४ हजारांचा माल जप्त करण्यात आला. चाकण एमआयडीसीतील खराबवाडी भागातील आणि मुळशी तालुक्यातील पौड भागातील गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आले आहेत.
शमीम ऊर्फ फसफस मेहबूब चौधरी (वय २१), राहुल मल्हारी तलवार (वय २७), मोहम्मद शहीद (वय २१, तिघेही रा. काळेवाडी, पिंपरी), राजाभाऊ रखमाजी घेणे (वय २३, रा. नकाते वस्ती, रहाटणी), शमशाद इस्लाम चौधरी (वय २१) अलीहुसेन महोम्मद इस्माईल खान (वय १९, दोघेही रा, गणेशनगर, थेरगाव), वली अब्दुल खान (वय २८, पिंपरी वाघेरे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चाकण आणि मुळशी तालुक्यात चोऱ्या करणाऱ्या टोळीची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे संतोष मोरे यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस निरीक्षक राम जाधव व त्यांच्या पथकाने आरोपींना सापळा रचून पकडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून एक टेम्पो (क्रमांक- एम एच-५०- ६७४४), वाहनांचे किमती स्पेअरपार्ट असा एकूण ५ लाख ७४ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. दिवसा भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने फिरून हेरगिरी करतात. त्यांनी काही दिवसांपासून चाकण एमआयडीसी भागात फिरून बंद कारखान्यांची व परिसराची माहिती गोळा करून रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी दरोडे टाकले होते. चाकण एमआयडीसी मधील वाघजाईनगर (खराबवाडी) हद्दीतील गुप्ता इंडस्ट्रीज व एस. एम. इंजिनिअरिंग या रात्रीच्या बंद असणाऱ्या कारखान्यांवर डल्ला मारून सुमारे दीड लाख रुपयांचे दुचाक्यांचे नवीन स्पेअरपार्ट चोरले होते. आरोपींना चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2015 रोजी प्रकाशित
चाकण व मुळशी तालुक्यात पाळत ठेवून चोऱ्या करणारी सात जणांची टोळी अटकेत
चाकण परिसर व मुळशी तालुक्यात दिवसभर भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने पाळत ठेवून रात्रीच्या वेळी चोऱ्या करणाऱ्या सात जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाने गुरुवारी अटक केली.
First published on: 14-03-2015 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police crime lcb arrest chakan midc