मद्य पिऊन भरधाव वाहने चालवून सरत्या वर्षांला निरोप देणाऱ्या तरुणाईला रोखण्यासाठी पोलिसांनी अपघातमुक्त नववर्षांचे स्वागत असा निर्धार केला आहे. गुरुवारी (३१ डिसेंबर) रात्रीपासूनच शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. फग्र्युसन रस्ता आणि लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्ता, कोरेगार पार्क येथील नॉर्थ मेन रस्त्यावर उसळणारी गर्दी ध्यानात घेऊन हे रस्ते टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहेत.
सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी नववर्ष बंदोबस्ताची माहिती मंगळवारी दिली. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक या वेळी उपस्थित होते.
राज्य सरकारने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतरही पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल आणि बार सुरू ठेवण्याची अनुमती दिली आहे. पुणे पोलीस राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करणार आहेत. अपघातमुक्त नववर्षांचे स्वागत करू, असा निर्धार करून पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आठशे पोलीस कर्मचारी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी रस्त्यावर असतील. मद्यप्राशन करून दुचाकी चालविणाऱ्यांना रोखण्यासाठी चौकाचौकात वाहतूक शाखेचे कर्मचारी ‘ब्रेथ अ‍ॅनॅलायझर’च्या साहाय्याने तपासणी करणार आहेत. विशेष शाखेने शहरातील २१ प्रमुख चौकांवर लक्ष केंद्रित केले आहे. पुणे आणि िपपरी-चिंचवड शहरातील संवेदनशील भागाचाही यामध्ये अंतर्भाव आहे. चांदणी चौक, महात्मा गांधी रस्ता, फग्र्युसन रस्ता, नॉर्थ मेन रस्ता येथे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन हे रस्ते सायंकाळनंतरच टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत, असे सुनील रामानंद यांनी सांगितले.
मद्यपी वाहनचालकांना नोटिसा
गेल्या वर्षी नववर्षांचे स्वागत करताना मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या ३७८ जणांना अटक करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी पोलिसांनी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत ४ हजार ८०० वाहनचालकांना पकडले आहे. या सर्व वाहनचालकांना पोलिसांनी रीतसर नोटिसा बजावल्या आहेत, असे सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी सांगितले. शहरातील प्रमुख चौकांत नाकाबंदी करून भरधाव वाहने चालविणाऱ्यांना रोखण्यात येणार आहे. नाकाबंदीच्या चौकामध्ये पोलीस व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्याबरोबरच शहरात कोठेही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचू शकतील, असे नियोजन करण्यात आले आहे. शीघ्र कृती दल, बाँब शोधक-नाशक पथक गर्दीच्या ठिकाणी तैनात राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
छेडछाड रोखण्यासाठी महिला अधिकाऱ्यांची गस्त
नववर्षांचे स्वागत करताना रस्त्यावर उसळणारी गर्दी ध्यानात घेता महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक गस्त घालणार आहे. पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण, प्रतिभा जोशी, वर्षांराणी पाटील या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कर्मचारी विविध रस्त्यांवर डोळ्यात तेल घालून पाहणी करणार आहेत.