करोना विषाणूंने देशभरात थैमान घातले असून नागरिकांनी घराबाहेर जाताना मास्क घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विना मास्क घराबाहेर पडलेला व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. आज पुण्यातील हडपसर भागातील साडे सतरा नळी येथे चिकन दुकानात नेहमी प्रमाणे कॅश घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा दुकानात काम करणार्‍या कामगाराने खून केल्याची घटना घडली आहे. यातील आरोपी दुचाकीवरून पळून जात असताना, त्याने मास्क घातला नव्हता. दरम्यान, रस्त्यावर बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी  त्याला अडवून मास्क का घातला नाही? असे विचारताच तो गडबडल्याने तो पकडला गेला. तसेच, अधिक चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

मृत आकाश लक्ष्मण भोसले (वय -२४ उन्नतीनगर, हडपसर) मूळचा निलंगा, तर लहू बनशी शिंदे असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

हडपसर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार , हडपसर भागात आमिर चिकन सेंटरची अनेक ठिकाणी फ्रॅन्चायझी आहेत. साडे सतरा नळी भागात दहा दिवसांपूर्वी दुकान सुरू करण्यात आले होते. या दुकानात आरोपी लहू बनशी शिंदे हा कामास होता. तर, मृत आकाश लक्ष्मण भोसले हा दररोज प्रत्येक दुकानांवरील कॅश गोळा करण्याचे काम करत होता. आकाशकडे दररोज साधारण ४ ते ५ लाखांच्या आसपास कॅश जमा असायची. तर आरोपी लहू आणि आकाश हे दोघे एकच रूमवर राहण्यास असल्याने, त्या दोघांमध्ये कामाबद्दल चर्चा व्हायची.

आज दुपारी नेहमीप्रमाणे साडे सतरा नळी येथील दुकानावर आकाश कॅश घेण्यासाठी गेला असता. आरोपी लहू याने त्याच्या जवळ असलेल्या चॉपरने डोक्यावर आकाशच्या डोक्यावर आणि मानेवर वार केले. यानंतर आकाश जवळ असलेली कॅशची बॅग घेतली व दुकानाचे शटर खाली घेऊन, दुचाकीवरून पळ काढला.

तर या घटनेची माहिती तेथील नागरिकांनी पोलीसांना देताच, काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहचले. दरम्यान त्याच परिसरात असलेल्या बीट मार्शलला एक तरुण दुचाकीवरून विना मास्क जात असल्याचे दिसला. त्याला थांबून मास्क का घातला नाही, असे विचारताच तो गडबडला आणि काही तरी वेगळे कारण असल्याने, त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन घटनास्थळी आणण्यात आले. यानंतर अधिक चौकशी केली असता त्याने  गुन्ह्याची कबुली दिली.

संबधीत आरोपीकडून ४ लाख ५ हजार ९०० रूपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे. खून करण्याचे कारण विचारले असता, मला पैशांची गरज होती. यातून हा गुन्हा घडल्याची कबुली आरोपीने दिली आहे. याप्रकरणी  अधिक तपास सुरू आहे.