पासपोर्ट नूतनीकरणाच्या वेळी पडताळणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या नागरिकांची पोलिसांकडून लूट होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या व्यक्तिंकडून पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या व्यक्तीने त्याच्या पासपोर्टची मुदत संपत असल्यामुळे त्याने तो नूतनीकरणासाठी दिला होता. आठ ते दहा दिवसांनंतर त्याचा पासपोर्ट नूतनीकरण होऊन आला. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात पडताळणीसाठी बोलविण्यात आले. त्यासाठी त्यांना सकाळी बोलावण्यास सांगितले. त्याठिकाणी कागदपत्रांची पडताळणी घेण्यात आली. वरिष्ठांच्या सहीसाठी त्यांना रात्री बोलविण्यात आले. त्यांच्या कागदपत्रांवर सही झाल्यानंतर पुन्हा पासपोर्ट पडताळणी विभागात गेल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले. त्या वेळी इतरही व्यक्तींकडून पैसे घेण्यात आले, अशी माहिती एका व्यक्तीने दिली.
याबाबत विधाते म्हणाले की, तत्काल पासपोर्टचे नूतनीकरण झाल्यास त्या व्यक्तीला पोलीस पडताळणीला पासपोर्ट आल्यानंतर बोलविले जाते. पोलीस ठाण्याच्या बाहेरच पासपोर्ट पडताळणीसाठी पैसे लागत नसल्याचा फलक लावण्यात आला आहे. या ठिकाणी पैसे घेतले जात नाहीत. मात्र, कोणी तक्रार केल्यास त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल.