आत्महत्येबाबतच्या एका प्रकरणात तपासासाठी आरोपीच्या घरी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला आरोपीने घरात कोंडून ठेवण्याबरोबरच एका महिलेसोबत मोबाईलमध्ये त्यांचे फोटो काढून बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकीही दिली. विश्रांतवाडी पोलिसांनी या आरोपीसह संबंधित महिलेला अटक केली आहे.
प्रकाश शंकर लंके (वय ३६, रा. अनिरुद्ध सोसायटी, विश्रांतवाडी) व कमल बाळू कापसे (रा. खडकी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भुतांबरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीच्या आत्महत्येस लंके हा कारणीभूत असल्याचा निनावी अर्ज खडकी पोलिसांना मिळाला होता. त्याच्या तपासणीसाठी भुतांबरे बुधवारी संध्याकाळी लंके याच्या घरी गेले. भुतांबरे यांना घरात घेतल्यानंतर लंके याने कमलला बोलवून घेतले. तिला भुतांबरे यांच्या शेजारी बसायला सांगितले. भुतांबरे यांनी विरोध केला, मात्र त्या कालावधीत लंके याने मोबाईलमध्ये फोटो काढले. त्याचप्रमाणे बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली.
भुतांबरे यांना घरात कोंडून लंके याने पोलिसांना दूरध्वनी केला. त्यानुसार पोलीस लंके याच्या घरी पोहोचले असता सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी लंके व या महिलेला अटक केली. भुतांबरे यांना फसवून फोटो काढून घेतल्यानंतर पोलिसांकडून दहा लाख रुपये मिळवून देतो, असे आमिष लंके याने या महिलेला दाखविले होते. पैशाचा मोहातून हे कृत्य केल्याचा जबाब या महिलेने पोलिसांना दिला आहे.