सात वर्ष विना तिकीट प्रवास केल्याने पाच वेळा मला जेलमध्ये जावं लागलं.  पण लोकांनी मला थेट आमदारकीचं तिकीट मिळालं. तिकीट मागण्यासाठी मी कोणत्याही पक्षाकडे गेलो नाही. लोकांनीच मला तिकीट दिलं आणि आमदार केलं. त्यामुळे माझ्यासारखा भाग्यवान आमदार महाराष्ट्रात किंवा देशात कुठेच सापडणार नाही असं वक्तव्य जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे. आळंदीमध्ये वारकरी संप्रदायाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सपत्नीक या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

सात वर्षे विदाऊट तिकीट प्रवास केला. कोणी तिकीट काढायला आलं तर मारायचो. म्हणायचो, पेशंटसोबत आहे, फुकटात जाऊ दे. तिकीट न काढल्याने सात वर्षात किमान पाच वेळा जेलमध्ये गेलो असं बच्चू कडू यांनी सांगताच उपस्थितांनी तरीही तिकीट मिळालं असं म्हणत पाय खेचण्याचा प्रयत्न केला. यावर त्यांनी भाजपा किंवा कोणत्या पक्षाचं तिकीट घेतलं नाही. लोकांनी मला तिकीट दिलं. मी एकाही पक्षाकडून निवडणूक लढवली नाही. कोणत्याही पक्षाकडे तिकीट मागायला गेलो नाही. थेट लोकांनीच मला आमदार केले. त्यामुळे माझ्यासारखा भाग्यवान आमदार महाराष्ट्रात किंवा देशात कुठेच सापडणार नाही अशी भावना व्यक्त केली.

“साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काम करणाऱ्या मजुराला दोनशे रुपये रोज मिळतात आणि आमदाराचा पगार दीड ते दोन लाख झाला आहे. यात मोठी विसंगती आहे. इंजिनिअरने केवळ चकरा मारल्या तर पंधराशे रुपये रोज मिळतात. आमदार त्यांच्याकडून पन्नास साठ हजार रुपये घेऊन जातात. पत्रकार एक बातमी लिहितो तर किमान एक लाखाचा हकदार होतो. पण मजुराला फक्त दोनशे रुपये रोज मिळतात. तफावत असली पाहिजे, मात्र एवढी मोठी नसावी,. जो कष्ट करतो त्याच्या पदरी दोनशे रुपये येतात. जो बेमानी करतो त्याच्या पदरी पंधराशे रुपये जातात. हा देश विचित्र अवस्थेत आहे,” असं बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं.

पुढे ते म्हणाले, “मंदिरात जाणारा आणि पंढरपुरचा वारी करणारा वारकरी मी नाही. तुकारामांच्या ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’, अभंगाचा वारकरी होण्याचं भाग्य मात्र मला लाभलं. ते मी करत गेलो, आणि मंदिरातील देव माणसात पाहत गेलो”.