राज्यभरातील दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत आणि त्याच्या वार्ता वाचून, पाणी टंचाईची छायाचित्र पाहून शहरवासीयांकडून आता कृतिरूप सहानुभूती व्यक्त होऊ लागली आहे. पुण्यातील वसुधाताई भिडे यांच्या कृतीतूनही अशीच कृतिरूप सहानुभती समोर आली आहे. दुष्काळी भागातील टँकरसाठी शक्य ती मदत द्या, असे आवाहन त्यांनी करताच महिलांकडून उत्स्फूर्तपणे पाण्यासाठी ‘लाख मोला’ची मदत गोळा झाली.
वसुधाताई भिडे सहकारनगरमधील अरण्येश्वर मंदिरामध्ये गेली चाळीस वर्षे कीर्तन सेवा मंडळ चालवत आहेत. राष्ट्रसेविका समितीच्याही त्या शाखाप्रमुख आहेत. दुष्काळग्रस्त भागातील वाडय़ा-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठय़ाचे काम जनकल्याण समितीने सुरू केले आहे आणि या कामात आपलाही खारीचा वाटा असावा, या विचाराने भिडे यांनी त्यांच्या भागातील चार महिला संस्थांशी संपर्क साधला. त्यातून सर्व संस्थांच्या सभासद असलेल्या महिलांचा मोठा मेळावाही आयोजित करण्यात आला. दुष्काळाची तीव्रता आणि अशा परिस्थितीत पिण्याचे पाणी व जनावरांसाठीचा चारा आदींच्या वाटपाची किती आवश्यकता आहे, हे या मेळाव्यात महिलांना सांगण्यात आले.
मेळाव्याच्या माध्यमातून दुष्काळी भागातील पाण्यासाठी जी शक्य असेल ती मदत करा, असे आवाहन वसुधाताईंनी सुरू केले आणि त्याला महिलांनी चांगला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. नुसती हळहळ व्यक्त करण्यापेक्षा आपणही काहीतरी करूया, हे त्यांचे आवाहन महिलांना मनोमन भावले आणि वसुधाताईंच्या प्रयत्नांना चांगले यश आले. फक्त आवाहन करायचा अवकाश महिला आपणहून निधी देत होत्या. अगदी थोडक्या दिवसात एक लाख रुपयांच्याहीवर रक्कम गोळा झाली आणि जनकल्याण समितीतर्फे टँकर पुरवठा व गावांमध्ये टाक्यांच्या वाटपाचे जे काम सुरू आहे, त्या कार्यासाठी ही लाख मोलाची मदत समितीकडे सुपूर्द करण्यात आली.
महिला पुरोहितांसाठी वेदिता मंडळ चालवणाऱ्या शुभांगी भालेराव आणि अनिता बिरजे, कला-क्रीडा मंडळ चालवणाऱ्या कुमुद वाघ, प्रबोधन व संस्कार केंद्र चालवणाऱ्या सुजाता साबळे आणि महिलांसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या शीला आगाशे, राष्ट्रसेविका समितीची अपर्णा शाखा यांचे मोलाचे साहाय्य या कामात मिळाले. पुष्पा दांडेकर, मनीषा साठे, श्री. दाते आदींनी मोठय़ा रकमेचे धनादेश दिले. त्यातून अगदी थोडय़ा अवधीत मोठी मदत गोळा झाली, असे भिडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.