पुणे महापालिकेत निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक तयार करण्याचे काम पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सुरू झाले असून गेल्या वर्षभरात वॉर्डस्तरीय निधीतून कोणकोणती कामे मनसेच्या नगरसेवकांनी केली तसेच त्यांचा किती निधी खर्च झाला, याचाही तपशील राज यांनी मागवला आहे.
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१२ मध्ये झाली होती. महापालिकेत प्रत्येक नगरसेवकाला वॉर्डस्तरीय निधीसाठी प्रत्येक वर्षीच्या अंदाजपत्रकात २० लाख रुपये उपलब्ध होतात. त्यातून आपल्या प्रभागातील छोटी-मोठी कामे नगरसेवक सुचवू शकतो व त्यानुसार या निधीतून वॉर्डस्तरीय कामे केली जातात. मनसेच्या प्रत्येक नगरसेवकाने वॉर्डस्तरीय तरतुदीसाठी कोणती कामे गेल्या आर्थिक वर्षांत सुचवली होती व त्यापैकी किती रक्कम कामावर प्रत्यक्ष खर्च झाली, याचा तपशील राज ठाकरे यांनी मागवला असल्याचे मनसेचे गटनेता वसंत मोरे यांनी गुरुवारी सांगितले.
महापालिकेची दर महिन्याची जी सर्वसाधारण सभा होते त्या सभेपुढे जी कार्यपत्रिका निर्णयासाठी आलेली असते, त्या बाबत पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी सभेपूर्वी प्रत्येक पक्षाची बैठक होते. या बैठकीत प्रत्येक प्रस्तावाबाबत पक्षाने सभागृहात कोणती भूमिका घ्यायची, कोणत्या प्रस्तावाला पाठिंबा द्यायचा, कोणत्या प्रस्तावाला विरोध करायचा याबाबत विचार-विनिमय केला जातो. या बैठकीला ‘अजेंडा मिटिंग’ म्हटले जाते. पक्षाने बोलावलेल्या आतापर्यंतच्या बैठकांना प्रत्येक नगरसेवकाची उपस्थिती कशाप्रकारे राहिली, कोण किती बैठकांना उपस्थित होते, याचाही तपशील राज यांनी द्यायला सांगितला आहे.
या संबंधीची सर्व माहिती संकलित करून सर्व नगरसेवकांच्या कामगिरीचा अहवाल लवकरच राज ठाकरे यांच्याकडे देणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.