पाचशे आसनक्षमता असलेले औंध येथील पं. भीमसेन जोशी नाटय़गृह १५ मे नंतर रसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. महापालिकेच्या या नव्या नाटय़गृहामुळे औंध, बाणेर, पाषाण, सूस, बालेवाडी, हिंजवडी या परिसरातील नाटय़प्रेमींची सोय होणार आहे.
विस्तारणाऱ्या शहरातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी उपनगरांमध्येही सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशी मागणी सातत्याने होत होती. ही बाब ध्यानात घेऊन कोथरूड येथे नाटय़गृह उभारण्यात आले. या नाटय़गृहाला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले. कोथरूडनंतर म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडानगरी आणि हिंजवडी येथील आयटी पार्क यामुळे पुणे विद्यापीठ परिसराचा झपाटय़ाने विकास झाला. ही बाब ध्यानात घेऊन येथील नागरिकांसाठी औंध येथे नाटय़गृह उभारण्याची घोषणा दत्ता गायकवाड यांनी आपल्या महापौरपदाच्या कारकीर्दीत केली होती. राजीव गांधी पुलाजवळ या नाटय़गृहाची जागाही निश्चित करण्यात आली. मात्र, गेल्या दहा वर्षांत या नाटय़गृहाचे काम रखडले होते.
किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना भारतरत्न किताब जाहीर झाल्यानंतर त्यांचा सन्मान करण्यासाठी या नाटय़गृहाला पं. भीमसेन जोशी यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. पाचशे प्रेक्षक नाटकाचा आनंद लुटू शकतील असे नाटय़गृह आणि उत्कृष्ट दर्जाचे कलादालन असे या नाटय़गृहाचे स्वरूप आहे. या नाटय़गृहाचे काम रखडल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनी पूर्वी एका कार्यक्रमात टीका केली होती. ‘माझ्या घराजवळ असलेल्या या नाटय़गृहामध्ये किमान एका प्रयोगामध्ये तरी रंगमंचावर काम करण्याचे भाग्य मला मिळावे’, असा सूर त्यांनी व्यक्त केला होता.
महापालिका रंगमंदिर मुख्य व्यवस्थापक भारत कुमावत यांनी या नाटय़गृहाची सर्व कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. नाटय़गृहामध्ये खुच्र्या बसविण्याचे काम येत्या महिनाअखेरीस पूर्ण होईल. प्रशासनाने १५ मे नंतर बुकिंग सुरू करण्यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. त्यापूर्वी इलेक्ट्रिक त्याचप्रमाणे स्वच्छता या विषयीच्या निविदा काढून ती जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. एकदा या नाटय़गृहाचे उद्घाटन झाले, की नाटय़संस्था तेथे नाटकाचा प्रयोग सादर करू शकतील, असेही कुमावत यांनी सांगितले.
 नाटय़गृह आणि आसनक्षमता
बालगंधर्व रंगमंदिर- ————–           ९९०
यशवंतराव चव्हाण नाटय़गृह –  ——–     ८९३
गणेश कला क्रीडा मंच – ————         २५००
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन-   ४००
पं. भीमसेन जोशी नाटय़गृह-  ——             ५००