सर्व सनातनी प्रवृत्ती एकमेकांना सामील असतात. ही परिस्थिती ओळखून त्यांच्या विरोधात पुरोगाम्यांची शक्ती एकवटली पाहिजे. अन्यथा जातीय शक्ती एकेकाला वेचून मारल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी बुधवारी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुण्यातील विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांतर्फे बुधवारी पुणे बंदचे आवाहन करण्यात आले. तसेच निषेध मोर्चाही काढण्यात आला. महापालिका भवनासमोरील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चाची सांगता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ करण्यात आली. या वेळी निषेध सभेचेही आयोजन करण्यात आले होते. या सभेत वैद्य बोलत होते.
महापौर वैशाली बनकर, आमदार जयदेव गायकवाड, कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अजित अभ्यंकर, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष सुभाष वारे, महापालिका कामगार संघटनेच्या अध्यक्ष मुक्ता मनोहर, ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, तसेच अंकुश काकडे, विशाल तांबे, सुभाष जगताप, मोहनसिंग राजपाल, डॉ. सतीश देसाई, नितीन पवार, गोपाळ तिवारी, वसंत साळवे, प्रतीमा परदेशी, वैशाली चांदणे, किरण मोघे, अश्विनी कदम, रूपाली चाकणकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
जादूटोणा, बुवाबाजी आणि श्रद्धेच्या नावाखाली समाजातील अंधश्रद्धा वाढता कामा नये, यासाठीच डॉ. दाभोलकर यांनी आयुष्यभर लढा दिला. मात्र, ज्या प्रवृत्तींनी महात्मा गांधी यांची हत्या केली, त्याच सनातनी प्रतिगाम्यांनी दाभोलकर यांनी हत्या केली, हे विसरता कामा नये. अशा गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी, जातीय शक्तींच्या विरोधात सर्व पुरोगाम्यांनी आता एकत्र येण्याची गरज आहे, असे भाई वैद्य यांनी यावेळी सांगितले. पुरोगाम्यांच्या विरोधात लढणे सोपे नाही. भगवान गौतम बुद्धांपासून हा लढा सुरू आहे. त्यामुळेच तुकोबांचा जयजयकार करताना मंबाजीसारख्या प्रवृत्ती आणि दाभोलकरांचे नाव घेताना प्रतिगामी प्रवृत्ती वाढत असतील, तर त्या सर्वाचा धिक्कारच केला पाहिजे, असेही वैद्य म्हणाले.
बंदलाही प्रतिसाद
निषेध मोर्चात नागरिक आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्यने सहभागी झाले होते. तसेच राजकीय पक्षांच्या आवाहनानुसार पुणे बंदलाही चांगला प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालये, प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने, तसेच रिक्षा वाहतूक बंद होती. दिवसभर शहरात ठिकठिकाणी बंदचे वातावरण अनुभवायला मिळत होते. तसेच डॉ. दाभोलकर यांच्या हत्येबाबतही ठिकठिकाणी चर्चा सुरू होती. अनेक ठिकाणी हत्येच्या निषेधाचेही फलक लावण्यात आले होते.
 सभेत गोंधळ, घोषणाबाजी
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार दलितांना नक्षलवादी ठरवून तुरुंगात डांबत आहे. त्याचाही या सभेत निषेध झाला पाहिजे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे म. ना. कांबळे यांनी सभेत बोलताना केली. या मागणीला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी लगेचच आक्षेप घेत ‘कोणत्याही पक्षाचे नाव घेऊ नका, पक्षाचा उल्लेख करू नका’ असे कांबळे यांना बजावले. त्यामुळे संघटना आणि राजकीय पक्ष अशा दोन्ही बाजूचे कार्यकर्ते सभेत उभे राहिले आणि त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्या पाठोपाठ हे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि वाद व जोरात ढकलाढकली सुरू झाली. या प्रकारामुळे सभेत चांगलाच गोंधळ झाला. अखेर भाई वैद्य यांनी सर्वाना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर शांतता झाली. तरीही राजकीय व्यक्तींना येथे बोलू देऊ नका, अशा घोषणा सभेत सातत्याने दिल्या जात होत्या. महापौर वैशाली बनकर यांनाही सभेत बोलू देण्यात आले नाही. या प्रकारानंतर डॉ. दाभोलकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सभा संपवण्यात आली.