कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्तचाचणी नमुना अहवालात ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे (फॉरेन्सिक डिपार्टमेंट) डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी फेरफार केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉ. तावरे, हाळनोर यांच्यासह शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. न्यायालयाने तिघांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.यापैकी एका डॉक्टरने ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून तीन लाखांची लाच घेतल्याचाही प्रकार समोर आला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अतुल घटकांबळे या कर्मचाऱ्यांकडून हे तीन लाख रुपये घेण्यात आले. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आल्यानंतर काहीच तासांनी अतुल घटकांबळे यांनाही अटक करण्यात आली. त्यामुळे या तिघांनाही ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तीन लाखांपैकी अडीच लाख रुपये हलनोरकडून तर उरलेले ५० हजार रुपये घटकांबळेकडून गुन्हे शाखेने जप्त केले आहेत. घटकांबळे हे डॉ.अजय तावरे यांच्याकडे काम करत होते. परंत, हे तीन लाख रुपये घटकांबळे यांनी कुठून आणले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हेही वाचा >> पुणे : रक्ताचे नमुने देणारा कोण? पोलिसांकडून तपास सुरू

सोमवारी एका सरकारी वकिलाने पुण्यातील न्यायालयात सांगितले, या प्रकरणात अटकेत असलेल्या तिघांनीही आर्थिक फायद्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने नष्ट केले. त्याऐवजी अन्य व्यक्तीच्या रक्ताचे नमुने दिले. त्यामुळे पोलिसांना तिघांची समोरासमोर चौकशी करायची होती.

अगरवाल याच्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांनी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >> अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या दोन्ही नमुन्यांत मद्यांश नसल्याचे उघड, रक्ताचे नमुने घेण्यास विलंब?

दोन्ही अहवाल नकारात्मक

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अपघात झाला. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलास ताब्यात घेण्यात आले. अपघातानंतर सकाळी नऊच्या सुमारास मुलाला ससून रुग्णालयात नेण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास रक्ताचे नमुने घेण्यात आले. ससून रुग्णालयातील प्राथमिक रक्ततपासणी अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना संशय आल्याने १९ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ओैंध येथील जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. रक्ताच्या नमुन्याचे अहवाल रविवारी (२६ मे) पोलिसांना मिळाले. दोन्ही अहवालांत मुलाच्या रक्तात मद्यांश आढळून आला नाही.