देशभरात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशीच परिस्थिती पुणे विभागात देखील आढळून येत असून आज पर्यंत 104 पर्यंत ही संख्या पोहोचली आहे. तर आज दिवसभरात तीन नवीन रुग्ण बाधित आढळले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. यावेळी दीपक  म्हैसेकर म्हणाले की, पुणे विभागात येणार्‍या जिल्ह्यामध्ये पुणे 74,सांगली 25,कोल्हापूर 2 आणि सातारा 3 अशी एकूण आज अखेर 104 रुग्ण बाधित आढळले आहे. या सर्व रुग्णांची तब्येत उत्तम असून यातील 19 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तर 16 लाखांहून अधिक घरांची तपासणी, तर त्या दरम्यान 75 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता. प्रशासनामार्फत पुणे विभागात विलगीकरण कक्ष सज्ज करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध संस्था सोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, पुणे विभागात अंदाजे 28 हजार 936 क्विंटल अन्नधान्याची मार्केटमध्ये आवक झाली आहे. विभागात भाजीपाल्याची आवक 9 हजार 901 क्विंटल, फळांची आवक 4 हजार 431 क्विंटल तसेच कांदा बटाट्याची आवक 9 हजार 168 क्विंटल इतकी झाली आहे. तर 3 एप्रिल पर्यंत 101.84 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 25.70 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.