पुलवामा हल्ल्यानंतर नागरिकांच्या मनात पाकिस्तानबद्दल राग आहेच पण त्याचवेळी शहीद झालेल्या सीआरपीएफच्या ४४ जवानांबद्दल दु:ख देखील आहे. देशातल्या वेगवेगळया भागात नागरिक आपआपल्यापरीने शोक संवेदना व्यक्त करत आहेत. रविवारी पुण्याहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातील प्रवाशांनी स्वतःहून सीआरपीएफच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८० प्रवासी क्षमता असलेल्या इंडिगोच्या या विमानात १०० पेक्षा जास्त प्रवासी होते. प्रवाशांनी स्वतःहून काही मिनिटे उभे राहून वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली. बोर्डिंगची प्रोसेस २ वाजून १० मिनिटांनी संपल्यानंतर सर्व प्रवासी आपल्या जागेवर बसले होते. काही प्रवासी तिथे ठेवलेले वर्तमानपत्र वाचत होते तर काही प्रवासी पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल चर्चा करत होते.

परस्परांशी बोलत असताना पुलवामाच्या घटनेबद्दल या प्रवाशांकडून संतापाची भावना व्यक्त होत होती. त्यातल्या काही प्रवाशांनी पुढाकार घेतला व सीआरपीएफच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विमानातील सर्वांना काही मिनिटे उभे राहण्याची विनंती केली. अन्य प्रवाशांनीही लगेच प्रतिसाद दिला. या सर्वांनी विमानात काही मिनिटे उभे राहून सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी विमानात पूर्णपणे शांतता होती असे प्रवीण कुमार या प्रवाशाने सांगितले. या घटनेमधून लोकांच्या मनात आपल्या जवानांबद्दल किती प्रेम, आत्मीयता आहे आणि दहशतवादाबद्दल किती चीड निर्माण झाली आहे ते दिसून आले. विमानातील काही मिनिटांचे हे वातावरण भारावून टाकणारे होते. प्रवाशांसोबत विमानांच्या केबिन क्रू ने ही सहकार्य केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune in indigo flight passangers pay tribute tp martyred crpf jawans
First published on: 18-02-2019 at 15:09 IST