नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असतनाच आणखी एक दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी तालुका इंदापूर येथे आज सायंकाळी वाहतूक करणारी एक बोट उलटली असून यातील काहीजण बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वादळी वाऱ्यामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत असून या बोटीमध्ये एकूण सात प्रवाशी प्रवास करत होते. यातील एकजण सुखरूप असून बाकीच्या सहा जणांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहिम सुरू केली असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट केलं असून शोधमोहिम सुरू असल्याचं म्हटलं आहे. उजनी धरणाच्या पात्रात वादळी वाऱ्यामुळे ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या घटनेसंदर्भात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

हेही वाचा : नाशिक : भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू ; एकाच कुटूंबातील चौघांचा समावेश

सुप्रिया सुळे यांचं ट्विट काय?

“उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी तालुका इंदापूर येथे आज सायंकाळी वाहतूक करणारी एक बोट उलटली. या घटनेत काहीजण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. परंतु येथे मदत आणि बचावकार्य करण्यासाठी आणखी साधनसामग्रीची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी पुणे यांना विनंती आहे की, आपण याची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. सदर घटना अतिशय गंभीर असून येथील मदत आणि बचाव कार्याचा मी सातत्याने आढावा घेत आहे. याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. बेपत्ता असणारे सर्वजण सुखरुप असावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

इगतपुरीच्या भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू

इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नाशिकरोड येथील एकाच कुटूंबातील चौघांसह पाचजणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेले चौघे अल्पवयीन आहेत. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नाशिकरोड येथील गोसावी वाडीत राहणारे खान कुटूंबिय रिक्षातून मंगळवारी इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आधी एकजण बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पाचही जण बुडाले. मुलांच्या आईने आरडाआरेड केल्यानंतर स्थानिक मदतीला धावून आले. स्थानिकांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune indapur ujani dam in boat drowned and 6 people drowned news gkt