चिन्मय पाटणकर

पारंपरिक विद्यापीठ ते नव्या काळाचे कौशल्य विद्यापीठ असे अनेक पर्याय विद्यार्थ्यांना पुण्यात मिळू लागले आहेत. कारण पुणे शहर आणि परिसर आता विद्यापीठांचा झाला आहे. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख पुण्याला पूर्वीच मिळाली आहे. मात्र गेल्या पंधरा-वीस वर्षांत पुण्याच्या चहुदिशांना नवनवी विद्यापीठे निर्माण झाली आहेत. त्यातही परिसरात खासगी विद्यापीठांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे जवळपास तीस विद्यापीठे पुणे शहर आणि जिल्ह्यात असून, येत्या काळात आणखी काही विद्यापीठांची भर पडणार आहे. त्यामुळे पुण्याची ओळख आता विद्यापीठांचे पुणे अशी झाली आहे. नवनव्या संकल्पनांवरील अभ्यासक्रमांपासून अनेक पर्याय ही विद्यापीठे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहेत.

ब्रिटिशांनी दोनशे वर्षांपूर्वी पुण्यात डेक्कन कॉलेजची स्थापना केली. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाविद्यालयांची संख्या वाढत गेली. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. तर खासगी शिक्षण संस्थांना मान्यता मिळू लागल्यानंतर अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, शिक्षणशास्त्र अशा विविध विद्याशाखांची महाविद्यालये सुरू झाली. गेल्या काही वर्षांत सरकारी धोरण बदलांमुळे महाविद्यालयांना स्वायत्तता मिळू लागली आहे. त्याशिवाय सीओईपीसारख्या महाविद्यालयाचे रुपांतर विद्यापीठात झाले आहे. सुरुवातीच्या काळात खासगी महाविद्यालये सुरू केलेल्या संस्थांनी स्वत:ची विद्यापीठे उभारण्यास सुरुवात केल्याने विद्यापीठांची संख्या झपाट्याने वाढली आहे. खासगी संस्थांच्या स्पर्धेमुळे जुन्या नामांकित संस्थाही आता स्वतंत्र खासगी विद्यापीठ उभारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे शासकीय, खासगी, अभिमत अशा तीन प्रकारातील जवळपास तीस विद्यापीठे पुणे आणि परिसरात उभी राहिली आहेत.

हेही वाचा : डॉ. प्रमोद चौधरी ‘प्राज’पर्वाचे प्रवर्तक

डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्पायसर विद्यापीठ, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, फ्लेम विद्यापीठ, सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठ, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पिंपरी, अजिंक्य डी वाय. पाटील विश्वविद्यालय, डीईएस पुणे विद्यापीठ, जेएसपीएम विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठ आंबी, डी. वाय. पाटील. आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आकुर्डी, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, विश्वकर्मा विद्यापीठ, पी. ए. इनामदार विद्यापीठ, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, एमआयटी एडीटी विद्यापीठ, ख्राइस्ट विद्यापीठ लवासा, एसएनडीटी महिला विद्यापीठ, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठ, निकमार विद्यापीठ, पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, श्री बालाजी विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ, अलार्ड विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ यांचा त्यात समावेश आहे. त्याशिवाय आयआयआयटी, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे) अशा केंद्रीय शिक्षण संस्थाही आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत शासकीय, खासगी असे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांसह कौशल्य विद्यापीठासारख्या नव्या संकल्पनेची विद्यापीठेही निर्माण होऊ लागली आहेत.

पुण्याला शैक्षणिक वारसा फार मोठा आहे. दोनशे वर्षांपूर्वी भारतात स्थापन झालेल्या पहिल्या तीन महाविद्यालयांपैकी एक पुण्यात होते. तेव्हापासूनच पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख प्राप्त झाली. त्यानंतर पुण्याचे शैक्षणिक क्षेत्रातील स्थान अधिक बळकट होत गेले. पुण्याची सांस्कृतिक ओळख, शहरात असलेले सुरक्षित वातावरण, गुणवत्तापूर्ण शिक्षकांची उपलब्धता हे पुण्यात विद्यापीठे वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्याशिवाय संशोधन संस्था असल्याने त्यांच्या सहकार्याने काम करणे सोपे होते. परदेशी आणि परराज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येण्याचे प्रमाण मोठे आहे, असे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत शिक्षणाचे महत्त्व अधिक वाढल्याने खासगी विद्यापीठांची भर पडत गेली. येत्या काळात ही संख्या आणखी वाढणार आहे. भारतात महत्त्वाच्या गोष्टींची सुरुवात पुण्यातच झाली आहे. त्यामुळे विद्यापीठांची वाढती संख्या हा एक महत्त्वाचा कल आहे. अर्थात विद्यापीठे वाढत असताना गुणवत्ताही वाढणे तितकेच गरजेचे आहे, याकडेही डॉ. पटवर्धन यांनी लक्ष वेधले. परवडणारे शुल्क असलेली शासकीय विद्यापीठे, केंद्र सरकारच्या शिक्षण संस्थांशिवाय जास्त सुविधा, निवास व्यवस्था करणाऱ्या आणि थोडे जास्त शुल्क असलेल्या खासगी विद्यापीठांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार, आवडीच्या अभ्यासक्रमानुसार प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. या विद्यापीठांमुळे पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. अभ्यासक्रमांशिवाय लिबरल आर्ट्सपासून विदा विज्ञान, जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्सपर्यंतचे वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम मिळू लागले आहेत.

हेही वाचा : वर्धापनदिन विशेष: ध्यासमग्न उद्योगपती : रवी पंडित

विद्यापीठांच्या वाढत्या संख्येबाबत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरूण अडसूळ म्हणाले, की बसपासून विमानापर्यंत हरतऱ्हेच्या वाहतूक सेवेने पुणे राज्य आणि देशाच्या अन्य भागांशी जोडले गेले आहे. त्याशिवाय निवास व्यवस्थाही चांगल्या रितीने उपलब्ध होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना शिक्षणासाठी पुण्याचे आकर्षण आहे. पुणे शहराला असलेला शैक्षणिक वारसा, उद्याोग क्षेत्राची उपलब्धता, प्राध्यापकांची उपलब्धता, पुण्याकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा असे विविध घटक लक्षात घेऊन खासगी संस्थांनी स्वतंत्रपणे विद्यापीठे उभारण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत विद्यापीठांची वाढलेली संख्या पाहता शिक्षणाचे माहेरघर किंवा ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट ही पुण्याची ओळख आता अधिक ठळक होताना दिसत आहे.

हेही वाचा : वर्धानपनदिन विशेष : पुणे शहराच्या राजकारणाचा अंतरंग

येत्या काळात खासगी विद्यापीठांमधील स्पर्धा अधिक वाढणार आहे. त्यामुळे विद्यापीठांना आपले वेगळेपण अधोरेखित करावे लागेल. त्यासाठी दर्जा निर्माण करावा लागेल. तसेच रोजगारक्षम अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटचे प्रमाण वाढवणे गरजेचे ठरणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये शैक्षणिक प्रक्रिया लवचिक होणार आहे. राज्य सरकारकडून समूह विद्यापीठांना मान्यता दिली जाणार आहे. स्वाभाविकपणे आणखी काही विद्यापीठांची भर पडणार आहे. त्यामुळे विद्यापीठांची संख्या वाढत असताना या सरकारी, खासगी विद्यापीठांमध्ये सहकार्य निर्माण होऊ शकते. परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक चांगले पर्याय मिळू शकतात. या विद्यापीठांमधील शैक्षणिक देवाण-घेवाण शैक्षणिक प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरू शकेल. अर्थात ती भविष्यातली गोष्ट झाली. सद्या:स्थितीत वाढत्या विद्यापीठांमुळे देशाच्या शैक्षणिक नकाशावर पुण्याचे स्थान अधिक ठळक झाले आहे, हे नक्की.

चिन्मय पाटणकर

chinmay.patankar@expressindia. com