पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उलटलेल्या गॅस टॅंकरमधील वायू गळती रोखण्यात यश आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आलीये. सध्या दोन्ही मार्गांवरील एक लेन सुरू करण्यात आली असून, त्यावरून गाड्या पुणे आणि मुंबईकडे रवाना करण्यात येत आहेत. पुढील दीड तासांत वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईल, अशी शक्यता महामार्ग पोलिसांनी व्यक्त केलीये.
खंडाळा घाटाजवळ गॅस टॅंकर उलटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक शुक्रवारी सकाळी थांबविण्यात आली होती. अमृतांजन पुलापासून काही अंतरावर हा गॅस टॅंकर उलटला. टॅंकरमधून वायूगळती होऊ लागल्यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याआधी सकाळी मुंबईकडून पुण्याकडे येणाऱया मार्गावर आयआरबी कंपनीचा टॅंकर आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही आयआरबी कंपनीचे कर्मचारी होते. खंडाळ्यातील बोगद्याजवळ सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(संग्रहित छायाचित्र)