भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीच्या निषेधार्थ आज (गुरुवार) पुण्यात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. मंडई परिसरात पडळकर यांचा पुतळा जाळून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच यावेळी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केलं होतं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केला आहे. पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता. पडळकर यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून टीकात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या.
दरम्यान, आज राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्यावतीने पडळकर यांच्याविरोधात निषेध नोंदवण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. पडळकरांचे या विधानाबद्दल खुद्द विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या इतर नेत्यांनी देखील कान टोचले. पडळकरांचं हे वक्तव्य वैयक्तिक असून भाजपाही या विधानाचा निषेध करतो, असे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.