सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची पीएच.डी. प्रवेश परीक्षा (पेट) ६ नोव्हेंबरला परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली असून, या परीक्षेद्वारे विद्यापीठातील शैक्षणिक विभाग आणि संलग्न संशोधन केंद्रातील पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या एकूण तीन हजार १८७ हजार जागा भरण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> पुणे : महापालिका प्रशासकपदाची जबाबदारी सौरभ राव यांच्याकडे ?

विद्यापीठाने पेट परीक्षेचे परिपत्रक गुरुवारी प्रसिद्ध केले. त्यामुळे परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार शंभर गुणांची परीक्षा असेल. परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखत घेऊन निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एम.फिल., नेट, पेट २०२१ अशा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना ही परीक्षा न देण्याची सवलत दिली जाईल. उमेदवारांना अर्जासोबतच कागदपत्रे अपलोड करावी लागतील. या परीक्षेचा निकाल १० नोव्हेंबरला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. परीक्षेबाबात अधिक माहिती उमेदवारांना https://bcud.unipune.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.