पुणे : पुण्यात वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या आखाती देशातील नागरिकांना लुटणाऱ्या दिल्लीतील चोरट्यांना पोलिसांनी पकडले. अटक करण्यात आलेली चोरटे इराणी टोळीतील असून, ते अरबी भाषेत आखाती देशातील नागरिकांशी संवाद साधत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चोरट्यांकडून तीन हजार डॉलर, ५०० सौदी रियाल, ५३ हजार रुपये आणि मोटार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरट्यांनी पुणे शहरात परदेशी नागरिकांकडे पोलीस असल्याची बतावणी करून त्यांना लुटल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सिकंदर अली शेख (वय ४४), करीम फिरोज खान (वय २९), इरफान हुसेन हाश्मी (वय ४४), मेहबूब हमदी खान (वय ५९, चौघे रा. दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सालेह ओथमान अहमद (वय ५२, रा. येमेन) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अहमद यांनी पत्नीला वैद्यकीय उपचारासाठी पुण्यात आणले होते. पुण्यात उपचारासाठी येणारे आखाती देशातील बहुसंख्य नागरिक कोंढवा भागात वास्तव्यास आहेत. त्यांनी हिंदी येत नाही, तसेच त्यांचा पेहराव वेगळा असल्याने ते पटकन नजरेस येतात, अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली.

हेही वाचा…पुणे : दांडेकर पूल, बिंदू माधव ठाकरे चौकात होणार ग्रेड सेपरेटर – उड्डाणपूल

अहमद ८ फेब्रुवारी रोजी कोंढव्यातून निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. पोलीस असल्याची बतावणी करून त्यांना लुटले होते. आरोपी मोटारीतून पसार झाल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले होते. पोलिसांनी जवळपास ६०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. पसार झालेले चोरटे पुण्यातून पसार झाल्याचे उघडकीस आले होते. दमणपर्यंत चोरटे मोटारीतून गेल्याची माहिती तपासात मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक लेखांजी शिंदे, पोलीस कर्मचारी सुहास मोरे, राहुल थोरात यांनी चोरट्यांचा माग काढला.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त गणेश पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, अमोल हिरवे, जयदेव भोसले, अभिजीत रत्नपारखी, अभिजीत जाधव, शशांक खाडे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा…पुणे : लहूजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा

सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे चोरट्यांचा माग

कोंढव्यात परदेशी नागरिकाला लुटून चोरटे पसार झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. मोटार द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका, मुंबई, चारोटी टोलनाका, डहाणूमार्गे दमणकडे गेल्याचे आढळून आले. आरोपी तेथील एका हॉटेलमध्ये मुक्कामास थांबले होते. हॉटेलमध्ये आरोपींनी त्यांचे ओळखपत्र दिले होते. पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. ओळखपत्र आणि हॉटेलमधील नोंदीवरुन आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी पुणे ते दमण असा साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करुन चोरट्यांचा माग काढला.