सायबर गुन्ह्य़ांच्या पाश्र्वभूमीवर राज्यात ५१ सायबर लॅब
पुणे शहरात वाढलेल्या सायबर गुन्ह्य़ांच्या पाश्र्वभूमीवर पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आलेल्या सायबर लॅबचे उद्घाटन सोमवारी (१५ ऑगस्ट) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र पोलिसांनी राज्यात वाढलेल्या सायबर गुन्ह्य़ांच्या पाश्र्वभूमीवर ‘महाराष्ट्र सायबर प्रकल्प’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत राज्यात ५१ सायबर लॅब सुरू करण्यात येणार आहेत.
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री बापट यांच्या हस्ते सायबर लॅबचे उद्घाटन होणार आहे. सायबर लॅब उभारण्यासाठी नॅसकॉमने पुणे पोलिसांना सहकार्य केले आहे. सायबर गुन्हे शाखेकडे सायबर लॅबचे कामकाज सोपविण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी जुलै महिना अखेरीर्पयंत पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे ९२४ तक्रारी आल्या आहेत. यामध्ये ४९५ फसवणुकीच्या तक्रारी आहेत. तसेच समाजमाध्यमांवर अश्लील छायाचित्र टाकून बदनामी के ल्याप्रकरणी ६९ तक्रारी आल्या आहेत. बँक खातेदारांची गोपनीय माहिती चोरून त्यांना गंडा घालण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बनावट फेसबुक खाते उघडण्याच्या घटनादेखील वाढल्या आहेत, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. सायबर लॅब सुरू झाल्यास तपासाला मदत होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Aug 2016 रोजी प्रकाशित
पुणे पोलिसांच्या सायबर लॅबचे आज उद्घाटन
यंदाच्या वर्षी जुलै महिना अखेरीर्पयंत पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे ९२४ तक्रारी आल्या आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-08-2016 at 03:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police cyber lab inaugurated today