Presentation At Workplace : कामाच्या ठिकाणी अनेकदा आपण काय काम करतो, हे व्यवस्थित सांगण्यासाठी आपल्या मॅनेजर किंवा मालकाला प्रेझेंटेशन द्यावे लागते किंवा काही वेळा तुमची कंपनी कशी काम करते, याविषयी ग्राहकांना कंपनीच्या वतीने प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्हाला माहिती द्यावी लागते. अशा वेळी तुम्ही प्रेझेंटेशन कसे सादर करता, हे खूप महत्त्वाचे आहे. आज आपण कामाच्या ठिकाणी प्रेझेंटेशन सादर करताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी जाणून घेणार आहोत.
तुमचा पोशाख चांगला असावा
प्रेझेंटेशन दरम्यान आपला पोशाख चांगला असणे आवश्यक आहे. अशा वेळी काळा किंवा तपकिरी रंगाचा पोशाख घालावा आणि त्यावर दुसऱ्या रंगाचा टाय किंवा स्कार्फ घालावा.अशा वेळी तुम्ही साडी सुद्धा नेसू शकता. तुमच्या पोशाखामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसून येते.
स्लाइड्स नीट असाव्यात.
प्रेझेंटेशन देताना प्रत्येक स्लाइड्स नीट आणि सुटसुटीत असाव्यात. कारण या स्लाइड्स तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सांगतात पण त्याचबरोबर तुमचे प्रेझेंटेशन अधिक प्रभावी दाखवण्यास मदत करतात. त्यामुळे स्लाइड्स नीट तयार करा.
समोरच्याला गुंतवून ठेवा
जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन देता तेव्हा समोरची व्यक्ती तुमचा बॉस, मॅनेजर किंवा ग्राहक असेल, त्यांना तुमच्या बोलण्यामध्ये गुंतवून ठेवा. त्यासाठी तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये फोटो किंवा व्हिडीओचा समावेश करा किंवा टूल्स किंवा गेम्स खेळा. त्यांच्याशी अधूनमधून संवाद साधा. यामुळे त्यांचे लक्ष तुमच्या प्रेझेंटेशनवर राहील
संवाद कौशल्य
प्रेझेंटेशनमध्ये संवाद कौशल्य खूप महत्त्वाचे आहे. तुमचा आवाज कसा आहे, तुम्ही कुठे जोराने बोलताहेत, तुम्ही कुठे हळूवार बोलताहेत, तुम्ही कुठे बोलताना थांबताहेत इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या असतात. याशिवाय तुम्ही समोरच्याबरोबर कसा संवाद साधता, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. तुमच्या संवादामुळे समोरच्याला तुम्हाला ऐकण्याची आवड निर्माण झाली पाहिजे.
देहबोली
संवादाबरोबर आपली देह बोली हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. तुमच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून आत्मविश्वास झळकला पाहिजे. तुमचा अॅटिट्युड खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही प्रेझेंटेशन सादर करताना हातांची हालचाल कसे करता किंवा बोलताना तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव कसे असतात, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.