संशोधनातून संभाव्य धोक्याची जाणीव; सिंचनासाठी पाणी न मिळण्याची भीती
जगभरातील अकरा देश पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त असल्याची धक्कादायक बाब पुढे आलेली असतानाच पुण्यातही सात वर्षांनंतर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. सन २०२५ मध्ये पुण्याचा, तर २०३१ मध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीसाठा तेंव्हाच्या लोकसंख्येच्या दृष्टीने प्रचंड अपुरा ठरणार असून पिण्याच्या पाण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती उद्भवणार असल्याचा अंदाज एका संशोधनातून व्यक्त करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्य़ातील सिंचनासाठी पाणी कसे मिळणार, हा प्रश्नही उपस्थित होणार आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता जाणवत आहे. अकरा देशांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात असून भारताचाही या देशांमध्ये समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामध्ये पाणी टंचाईमुळे वापरण्याजोगे पाणी काही दिवसांत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरच स्थलांतरित करण्याची वेळ आल्याची परिस्थिती तेथे दिसत आहे. या पाश्र्वभूमीवर पाण्याचा विपुल साठा असणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्येही येत्या काही वर्षांत अशा प्रकराची आपत्ती येऊ शकेल, असे चित्र संशोधनाअंती दिसत आहे.
पर्यावरण, सिंचन आणि जलविद्युत अभ्यासक राजेंद्र माहुरकर यांनी यासंदर्भात संशोधन केले आहे. शहरातील पाणीसाठे, त्यांचा वापर, सिंचन आणि प्रस्तावित उपाययोजनांवर या अभ्यासात ऊहापोह करण्यात आला आहे. त्यांच्या या संशोधनाला कोलकता येथे झालेल्या ‘इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन’च्या राष्ट्रीय परिषदेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. शहराचा विकास आराखडा करताना सन २०२५ पर्यंत शहरातील लोकसंख्येचे देण्यात आलेले प्रमाण आणि खडकवासला साखळी प्रकल्पातील उपलब्ध पाणी यांचा विचार करून प्रती माणशी किंवा पाणीपुरवठय़ासाठी प्रत्येक दिवशी किती पाणी लागेल, याची माहिती आकडेवारीसह माहुरकर यांनी त्यांच्या संशोधन अहवालात दिली आहे. पुण्याबरोबरच पाणी वितरणाबाबत देशाचे चित्रही आकडेवारीसह त्यांनी दिले आहे. पुण्यात सन २०२५, तर पिंपरी-चिंचवडमध्ये २०३१ मध्ये पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
खडकवासला साखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगांव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांची पाणी साठवणूक क्षमता २९ टीएमसी आहे. शहराच्या सीमांमध्ये वाढ होत आहे. भौगोलिक क्षेत्र विस्तारत असताना पाण्याचा विचार होणे आवश्यक होते. सन २०१३ मध्ये ३७ लाख लोकसंख्या गृहीत धरून प्रती दिन १३०६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याची मागणी होती. सद्य:स्थितीत शहराला १६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची आवश्यकता आहे. खडकवासला साखळी प्रकल्पातून आणि नियोजित भामा-आसखेड प्रकल्पातून मिळणारे २ टीएमसी पाणी असे गृहीत धरून १८.५८ टीएमसी किंवा प्रती दिवशी १४४३ दशलक्ष लिटर पाणी पुरवठय़ाची मागणी प्रस्तावित आहे. सन २०२७ मध्ये शहराची लोकसंख्या ५७ लाखांच्या घरात जाणार असून स्थलांतरितांचे प्रमाणही या कालावधीत वाढणार आहे. या सर्व बाबींचा विचार केला तर २०२५ मध्ये प्रती दिवशी १५०६ दशलक्ष लिटर पाणी लागणार आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी कसे द्यायचे हा प्रश्न गंभीर होणार आहे.
पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या २०१३ मध्ये वीस लाख होती, तर २०३१ मध्ये ती २९ लाख होण्याची शक्यता आहे. सन २०१३ मध्ये प्रती दिन ४३२ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता शहराला होती. त्यामध्येही वाढ होणार असल्यामुळे २०३१ मध्ये या शहरात पाण्याची तीव्र समस्या जाणवण्यास प्रारंभ होणार आहे, असे माहुरकर यांनी संशोधन अहवालात नमूद केले आहे.
नवे जलस्रोत निर्माण करण्याची गरज
धरणातील उपलब्ध पाणी आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता नवे जलस्रोत निर्माण करण्याची आवश्यकता असून त्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. सध्या पाण्याचा सर्वाधिक वापर सिंचनासाठी होत असून हे प्रमाण ८० ते ८५ टक्के आहे. पीएमआरडीएची स्थापना करतानाही ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यासाठी पुणे हायड्रोमेटिक रिजन डेव्हलपमेंट अॅथोरिटी करण्याची आवश्यकता होती आणि त्या प्राधिकरणाचा पीएमआरडीए घटक असणे अपेक्षित होते.
संभाव्य धोका टाळण्यासाठी धरणांची एकमेकांना जोडणी करावी लागणार आहे, अशी माहिती राजेंद्र माहुरकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
नियोजन गरजेचे
- धरणातील उपलब्ध पाण्याचा सर्वाधिक वापर सिंचनासाठी.
- उपलब्ध पाणीसाठय़ासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज
- शहराच्या अनियंत्रित वाढीवर नियंत्रण ठेवायला हवे
- वास्तवता आणि गरजा लक्षात घेऊन नियोजन अपेक्षित
- नियोजन आणि धोरणासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची आवश्यकता