पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे सरासरी ९० टक्के भरल्यामुळे शहरात गेले १७ महिने सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्यात आली असून यापुढे पुण्यात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय गुरुवारी मुंबईत घेण्यात आला.
पुणे आणि परिसरात गेला महिनाभर दमदार पाऊस पडत असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणात ८८ टक्के, पानशेतमध्ये ९५ टक्के, वरसगावमध्ये ८८ टक्के आणि टेमघर धरणात ८३ टक्के साठा झाल्यामुळे मुठा नदीतून आतापर्यंत चार टीएमसी आणि कालव्यातून दोन टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे. हे सहा टीएमसी पाणी पुणे शहराची पाच महिन्यांची गरज भागवू शकले असते. त्यामुळे पुरेसा साठा झाल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन पुण्याची पाणीकपात रद्द करावी, अशी आग्रही मागणी स्वयंसेवी संस्था, पुणेकर आणि नगरसेवकांकडून केली जात होती. पुण्यात १ मार्च २०१२ पासून पाणीकपात सुरू आहे.
या मागणीनुसार पुणे शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करावा, असा निर्णय गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार, कृष्णा खोरे विकास मंडळाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, आमदार मोहन जोशी या वेळी उपस्थित होते. दोन वेळा पाणी देण्यासंबंधी झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंबंधीचा आदेश पवार यांनी लगेचच महापालिकेला दिला. पाणीकपात रद्द करण्याचा मुद्दा आमदार मोहन जोशी यांनी विधानपरिषदेतही उपस्थित केला होता. शहराला दोन वेळा पाणी द्या, अशी मागणी त्यांनी या वेळी केली होती.
शहराला सध्या रोज साडेअकराशे दशलक्ष लिटर पाणी दिले जात असून त्यात दोनशे दशलक्ष लिटरची वाढ करून रोज साडेतेराशे दशलक्ष लिटर पाणी द्यावे, याबाबत पाटबंधारे विभागाला आम्ही यापूर्वीच पत्र दिले होते. तसा निर्णय आता शासनानेही घेतला आहे. त्यामुळे दोन वेळा पाणीपुरवठा सुरू करता येईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पुण्यात आता रोज दोन वेळा पाणीपुरवठा केला जाईल. येत्या दोन-तीन दिवसात तसे नियोजन केले जाईल व त्यानुसार पुण्याला पाणी मिळेल, असे महापौर वैशाली बनकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सभागृहनेता सुभाष जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे हेही या वेळी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2013 रोजी प्रकाशित
पुण्याची पाणीकपात रद्द; दोन वेळा पाणी मिळणार
शहरात गेले १७ महिने सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्यात आली असून यापुढे पुण्यात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय गुरुवारी मुंबईत घेण्यात आला.
First published on: 02-08-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune will get water twice in day