पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ (वय 55) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. शहर आणि जिल्ह्यातील बोगस शाळा, बोगस शिक्षक भरतीची अनेक प्रकरणे भुजबळ यांनी उघडकीस आणली होती. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.
भुजबळ यांच्यावर नुकतीच खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी पहाटे त्यांची तब्येत खालावून त्यांचे निधन झाले. पुणे जिल्हा परिषदेत शिक्षण विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या भुजबळ यांच्याकडे मुळशी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदाचेही काम देण्यात आले होते.
हेही वाचा…पुणेकरांसाठी मोठी बातमी; लोकसभेचे मतदान होईपर्यंत पाणीकपात नाही
बोगस शिक्षक भरती, बोगस शाळांची प्रकरणे भुजबळ यांनी उघडकीस आणले होते. शिक्षण विभागातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सुरू असलेल्या चौकशीदरम्यान त्यांनी साक्ष दिली होती. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून भुजबळ यांनी ओळख निर्माण केली होती.