राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू सहायक पोलीस आयुक्त राजाराम रामराव पाटील यांना दुसऱ्यांदा ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. त्याचबरोबर सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव आणि पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना देखील ‘राष्ट्रपती पोलीस पदका’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदके’ जाहीर झाली आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन सहाय्यक पोलीस आयुक्त आणि एका पोलीस निरीक्षकाचा यात समावेश असून उत्कृष्ठ सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम रामराव पाटील हे देखील पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत आहेत.
रामचंद्र जाधव यांची एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख आहे ते देखील पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत आहेत. त्याचबरोबर बालाजी सोनटक्के हे अगोदर चिखली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून काम पहात होते, ते आता गुन्हे शाखेचे काम पाहतात. महाराष्ट्रातील पाच जणांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची मान अभिमानाने उंचावली आहे.