ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची अमेरिकेतील ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्स’ या संस्थेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. जागतिक प्रतिष्ठा लाभलेल्या या संस्थेची ‘फेलोशिप’ मिळवणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले आहेत.
‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्स’ ही अमेरिकास्थित जगातील शास्त्रज्ञांची संघटना आहे. जगभरातील आघाडीच्या संशोधन संस्थांचे प्रतिनिधी, नोबेल विजेते शास्त्रज्ञ, एखाद्या शोधासाठी स्वामित्व हक्क मिळालेले संशोधक यांनाच या संस्थेचे सदस्यत्व मिळते. या जागतिक प्रतिष्ठेच्या संस्थेचे सदस्यत्व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मिळाले आहे. यापूर्वी आणि यावर्षीही भारतीय वंशाच्या काही शास्त्रज्ञांना हे सदस्यत्व मिळाले आहे. मात्र भारतीय संशोधन संस्थेचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. माशेलकर हे पहिले सदस्य आहेत. राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान (एनआयएफ) या संस्थेचे प्रतिनिधित्व ते करत आहेत. भारतातील संशोधन आणि स्वामित्व हक्काबाबत डॉ. माशेलकर यांच्या योगदानासाठी त्यांना हे सदस्यत्व मिळाले आहे.
‘आपले संशोधन क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असून त्यामुळे सामाजिक, आर्थिक विकास साधण्याबरोबरच, लोकांचे जीवनमान उंचावण्यासही मदत झाली आहे. त्यामुळे ‘एनएआय’ च्या निवड समितीकडून आपली निवड करण्यात येत आहे,’ अशा आशयाचे पत्र एनएआयच्या अध्यक्षांकडून डॉ. माशेलकर यांना पाठवण्यात आले आहे.