scorecardresearch

पुणे : विद्युतीकरणामुळे रेल्वेची २४६ कोटींची बचत

लोणंद-फलटणसह पुणे ते कोल्हापूर विभागाचे विद्युतीकरण २०१९ मध्ये सुरू झाले आणि २०२२ मध्ये पूर्ण झाले.

railway-3
(संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता)

रेल्वेच्या पुणे विभागातील विद्युतीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. यामुळे रेल्वेची वर्षाला २४६ कोटी रुपयांची बचत आहे. याचबरोबर कार्बन उत्सर्जनही मोठ्या प्रमाणात कमी करण्यात रेल्वेला यश मिळाले आहे, अशी माहिती पुण्याच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिली. जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्यासाठी भारतीय रेल्वे वेगाने पावले टाकत आहे. रेल्वेने शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने जाण्याची वाटचाल सुरू केली असून, हे उद्दिष्ट २०३० पर्यंत गाठले जाणार आहे.

हेही वाचा >>> ’आयआरसीटीसी’च्या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून ज्येष्ठाला साडेतीन लाखांना गंडा

याबाबत दुबे म्हणाल्या की, पहिली इलेक्ट्रिक गाडी डेक्कन क्वीन १ जून १९३० रोजी मुंबई ते पुणेदरम्यान धावली. विभागाचे विद्युतीकरण १ हजार ५०० व्होल्ट डीसीवर करण्यात आले होते. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील डीसी ट्रॅक्शनचे एसी ट्रॅक्शनमध्ये रूपांतर २००४ मध्ये सुरू झाले आणि ते २००८-०९ मध्ये पूर्ण झाले. दुसरे विद्युतीकरण पुणे आणि दौंड दरम्यानच्या विभागात करण्यात आले. नंतर ते बारामतीपर्यंत विस्तारीत करण्यात आले. हे काम २०१४ मध्ये सुरू झाले आणि २०१९ मध्ये पूर्ण झाले. लोणंद-फलटणसह पुणे ते कोल्हापूर विभागाचे विद्युतीकरण २०१९ मध्ये सुरू झाले आणि २०२२ मध्ये पूर्ण झाले.

सध्या पुणे विभागात ५३१ किलोमीटर मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण झाले आहे. चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या ११ जोड्या इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमध्ये बदलल्या आहेत. पुणे विभागात शताब्दी एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, झेलम एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस या प्रमुख गाड्या इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर धावतात. यामुळे पुणे विभागाच्या इंधन खर्चात मोठी घट झाली आहे. ही घट दरमहा सरासरी २ हजार ३०३.०४ किलोलिटर असून त्यामुळे वार्षिक ०.७३३ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होते, असे दुबे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : रेल्वेद्वारे जनऔषधींचा जागर ; पुणे-दानापूर एक्स्प्रेसच्या डब्यांवर योजनेचे महत्त्व सांगणारा मजकूर

रेल्वे विद्युतीकरणाचा वेग २०१४ पासून नऊपट वाढला आहे. रेल्वेने ब्रॉडगेज मार्गांच्या विद्युतीकरणाचे नियोजन केले आहे. यामुळे डिझेल ट्रॅक्शन काढून टाकणे सुलभ होईल. याचबरोबर कार्बन उत्सर्जन कमी होऊन आणि हवा प्रदूषणात घट होईल, असे त्यांनी नमूद केले.

या पत्रकार परिषदेला अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ.स्वप्नील निला, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता नारायण हरी माहेश्वरी, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.रामदास भिसे, पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर उपस्थित होते.

रेल्वेच्या विद्युतीकरणाचे फायदे

– पर्यावरण अनुकूल वाहतुकीचे साधन

– डिझेल इंधनावरील अवलंबित्व कमी

– कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत

– कार्यान्वयन खर्च कमी

– अवजड मालवाहू गाड्यांची वाहतूक सुलभ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 18:21 IST