प्रतिनिधी, पुणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये ८७ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. तर, खडकवासला पाठोपाठ पानशेत धरणही शंभर टक्के भरले आहे. दरम्यान, धरण क्षेत्रांत गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस परतला आहे. त्यामुळे धरणामधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

टेमघर धरण परिसरात दिवसभरात वीस मिलिमीटर, वरसगाव सहा, पानशेत पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, खडकवासला धरण परिसरात सायंकाळपर्यंत पाऊस पडला नाही. चारही धरणांत मिळून एकूण २५.४३ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ८७.२३ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. खडकवासला आणि पानशेत ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरली असल्याने  दोन्ही धरणांमधून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

पानशेतमधून ९९० आणि खडकवासलातून मुठा नदीपात्रात शनिवारी दुपारपासून सहा हजार ८४८ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. तसेच कालव्यातून १३५५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. रात्री आणि रविवारी दिवसभरात धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस झाल्यास विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे. मागील वर्षी दोन ऑगस्टपर्यंत चारही धरणांत मिळून २४.५० टीएमसी एवढा पाणीसाठा होता. यंदा या तारखेपर्यंत २५.४३ टीएमसी म्हणजेच एक टीएमसीने पाणीसाठा अधिक आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainfall in the dam region
First published on: 05-08-2018 at 03:37 IST