scorecardresearch

पालिका आयुक्तांच्या आगमनामुळे चिंचवडचे नाटय़गृह ‘समस्यामुक्त’

… मात्र, नाटक पाहण्यासाठी आयुक्त येणार असल्याचे समजताच नाटय़गृह व्यवस्थापनाने वेगवान हालचाली केल्या व सर्व समस्या अचानक लुप्त झाल्या.

पालिका आयुक्तांच्या आगमनामुळे चिंचवडचे नाटय़गृह ‘समस्यामुक्त’

चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाटय़गृहातील मनमानी कारभार व दुरवस्थेविषयी सातत्याने तक्रारी झाल्या. मात्र, त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. मात्र, नाटक पाहण्यासाठी आयुक्त येणार असल्याचे समजताच नाटय़गृह व्यवस्थापनाने वेगवान हालचाली केल्या व सर्व समस्या अचानक लुप्त झाल्या.
बुधवारी रात्री साडेनऊ वाजता भरत जाधव यांच्या ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा प्रयोग होता. त्याची माहिती दोन दिवसांपासून नाटय़गृह व्यवस्थापनाला होती. त्यामुळे झाडून सगळे कामाला लागले. अस्वच्छ नाटय़गृहाची वेगाने झाडलोट व साफसफाई झाली. अनेक महिन्यांपासून शौचालयातील दुर्गंधीचा त्रास होता, तो दूर करण्यात आला. कायम बंद असणारी वातानुकूलित यंत्रणा ‘कामाला’ लागली. ध्वनिक्षेपकामध्ये होणारा (की जाणीवपूर्वक केला जाणारा) बिघाड ही सर्वात मोठी समस्या होती, तीही तात्पुरत्या स्वरूपात दूर करण्यात आली. आयुक्त ज्या खेळासाठी उपस्थित राहणार होते, त्यावेळेसाठी भाडय़ाने दुसरे ध्वनिक्षेपक बसवण्यात आले. खेळ सुरू होण्याच्या वेळी सर्व कर्मचारी आपापल्या जागेवर हजर होते. आयुक्त कुटुंबासह आले, त्यांनी नाटकाचा मनमुराद आनंद लुटला. कोणताही अडथळा न येता खेळ पार पडल्याने रसिकही सुखावले. दरम्यानच्या काळात नाटय़गृहातील दुरवस्था व त्यात अचानक झालेल्या बदलांची सर्व माहिती काही नागरिकांनी आयुक्तांना दिली. त्यानंतर, आयुक्तांनी सर्वानाच फैलावर घेतले. आयुक्तांच्या येण्यामुळे असे सुखद बदल दिसणार असतील तर त्यांनी नेहमीच अशा कार्यक्रमांना यावे, अशा भावना प्रेक्षकांनी व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-11-2013 at 02:39 IST

संबंधित बातम्या