वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाचे सलग तीस तासात सात प्रयोग सादर करण्याचा विक्रम गिरीश देशपांडे करणार आहेत. हे प्रयोग मोफत असून २७ व २८ ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहेत, अशी माहिती तीर्थराज प्रॉडक्शनचे प्रवक्ते प्रफुल्लचंद्र तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याआधी सलग पाच प्रयोग करण्याच्या त्यांच्या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे. यावेळच्या तीस तासाच्या विक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पहिला प्रयोग २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. हे प्रयोग दुसऱ्या दिवशी ३ पर्यंत चालू राहणार आहेत. मोहन जोशी, डॉ. वि. भा. देशपांडे, सुधीर गाडगीळ आणि नटसम्राटाची भूमिका केलेले डॉ. श्रीराम लागू या वेळी उपस्थित राहणार आहेत.