मुदतवाढ देण्यास नकार

पुणे : राज्यात अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी १२ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आता नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात येणार नसल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी मंगळवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शासनाने यंदा अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य मंडळामार्फत २१ ऑगस्टला राज्यभरात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. राज्य मंडळाने सीईटीच्या नोंदणीसाठी २० जुलैपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली. मात्र संकेतस्थळाला तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने अर्ज प्रक्रिया २१ जुलैपासून काही दिवसांसाठी बंद ठेवून पुन्हा सुरू करण्यात आली. अर्ज भरण्यासाठीची मुदत मंगळवारी संपली.

राज्य मंडळातर्फे  होणाऱ्या अकरावीच्या सीईटीसाठी ११ लाख ९९ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. काही विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्याची नोंद संगणकीय प्रणालीत होणे बाकी आहे. त्यामुळे राज्यभरातून सुमारे बारा लाख विद्यार्थी ही सीईटी देतील असा अंदाज आहे. सीईटीच्या नोंदणीसाठी अर्ज करायला मुदतवाढ देण्याबाबत मागणी आलेली नसल्याने आता नोंदणीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.

प्रत्येक केंद्रावर ३०० विद्यार्थी

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अजूनही संपलेला नसल्याने सुरक्षित वातावरणात विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे राज्य मंडळाचे नियोजन आहे. सुरक्षित अंतराचे नियम पाळून एका परीक्षा केंद्रावर साधारण ३०० विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Registration of 12 lakh students for the 11th cet akp
First published on: 04-08-2021 at 00:01 IST