कर्णमधुर पण प्रयोगशील आणि सर्जनशील संगीत देणारे प्रख्यात संगीतकार आनंद मोडक यांचे शुक्रवारी पुणे येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.
मोडक हे गुरुवारी दिवसभर ध्वनिमुद्रणात होते. शुक्रवारी सकाळी ते रवींद्र साठे यांच्यासोबत गजाननविजय पोथीतील ओव्यांचे ध्वनिमुद्रण करणार होते. परंतु, त्यांनी त्यापूर्वी साठे यांना बरे वाटत नसल्याचे सांगितले. तोच त्यांचा अखेरचा दूरध्वनी ठरला. त्यानंतर ते हृदयविकाराच्या झटक्याने घरातच कोसळले.
मोडक यांनी रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत आपल्या संगीताने ठसा उमटविला होता. ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘बेगम बर्वे’, ‘महापूर’, ‘पडघम’, ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांच्या आशयाला त्यांच्या संगीताने वेगळ्याच उंचीवर नेले होते. ‘२२ जून १८९७’, ‘कळत नकळत’, ‘सूर्योदय’, ‘चाकोरी’,  ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘सरकारनामा’, ‘पाश’, ‘फकिरा’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘आरंभ’, ‘धूसर’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटातील संगीतही रसिकांकडून तसेच समीक्षकांकडून अतिशय वाखाणले गेले.
‘एक झोका, चुके काळजाचा ठोका’, ‘जाई जुईचा गंध मातीला’, ‘युगा युगांचे नाते आपुले’, ‘श्रावणाच ऊन मला झेपेना’, ‘हे जीवन सुंदर आहे’, ‘तू तलम अग्नीची पात’, ‘वळणवाटातल्या मातीत हिरवे गंध’, ‘मना तुझे मनोगत मला कधी कळेल का’, ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ ही त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात दरवळत आहेत. त्यांनी ‘लोकसत्ता’च्या लोकरंग पुरवणीसाठी गेल्याच वर्षी ‘स्मरण स्वर’ हा स्तंभ लिहिला होता. राज्य सरकारच्या पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
आनंद मोडक   १९५१ – २०१४

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renowned marathi music director anand modak dies at
First published on: 24-05-2014 at 03:44 IST