पुण्याच्या मध्यातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्या. प्रत्येक पुणेकर दिवसातून एकदा तरी या नद्या ओलांडून जातो. पण या प्रदूषित नद्यांना स्वच्छ करण्यासाठी आपण काही करू शकतो का असा विचार मात्र खूप कमी जणांच्या मनात येतो. निरंजन उपासनी या नागरिकाने मात्र दहा वर्षांत नदी स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे.
पर्यावरण क्षेत्रामध्ये गेली दहा वर्षे काम करणाऱ्या उपासनी यांनी पुढील दहा वर्षांमध्ये पुण्यातल्या नद्या स्वच्छ आणि सुंदर कशा करता येतील, यावर विचार सुरू केला आहे. तसेच त्यांचे गुरू निसर्ग कार्यकर्ते प्रकाश गोळे यांनी बंडगार्डन पुलाच्या खाली ‘डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य’ उभारले होते. पण शहरीकरणामुळे या अभयारण्यामध्ये आता पक्षी येतच नाहीत. त्यामुळे ते उजाड झाले आहे. या अभयारण्याला पुनरुज्जीवन देण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. हे दोनही संकल्प पुणेकरांच्या मदतीने तडीस नेण्याचे उपासनी यांनी ठरवले आहे. त्यासाठीची पहिली बैठकही सोमवारी झाली. आता पुढच्या आठवडय़ात दुसऱ्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यांना या कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी ९६२३४४४१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपासनी यांनी केले आहे. ‘सर्वाच्या साथीने हे संकल्प तडीस नेण्याचा प्रयत्न राहील,’ असे उपासनी यांनी सांगितले.