scorecardresearch

पुणे : वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आरटीओचा दंडुका, चालू महिन्यात तीन हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई

पुण्यातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अपघात जास्त होणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाईचा दंडुका उगारला आहे

RTO office
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

पुणे : पुण्यातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अपघात जास्त होणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाईचा दंडुका उगारला आहे. मार्च महिन्यात आतापर्यंत तीन हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रामुख्याने विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई झाली आहे.

याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले की, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मागील दोन-तीन महिन्यांतील रस्ते अपघातांचे तुलनात्मक विश्लेषण केले होते. त्यात अपघातांमध्ये दुचाकी अपघात व पादचाऱ्यांशी निगडित अपघातांचे प्रमाण तब्बल ९० टक्के असल्याचे समोर आले. याचबरोबर अपघातप्रवण आणि प्राणांतिक अपघात वारंवार होणारी ठिकाणे शोधण्यात आली. ही ठिकाणे प्रामुख्याने हडपसर, लोणीकंद, लोणी काळभोर, विमानतळ, वारजे, सिंहगड रस्ता या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील होती. त्यामुळे या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करण्यात आली.

हेही वाचा >>>> नागपूर : ‘आरटीओ’ कार्यालय ‘स्क्रॅप’ धोरणापासून अनभिज्ञ!, माहिती अधिकारात माहिती देण्यासही टाळाटाळ

आरटीओच्या तपासणी पथकांनी १ ते २३ मार्च या कालावधीत ३ हजार १७० वाहनचालकांवर कारवाई केली. सर्वाधिक कारवाई विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर झाली असून, त्यांची संख्या ७५२ आहे. वाहन क्रमांक योग्य नसणे ३८२, वाहन चालवताना मोबाईलचा वापर १६३, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे १७६, सीटबेल्ट न वापरणे १४९, विनापरवाना वाहन चालवणे ५५४, खिडक्यांना काळ्या काचा लावणे ७३, ट्रिपल सीट १४०, चुकीच्या ठिकाणी वाहन उभे करणे २०१ आणि वेगमर्यादा न पाळणे ५९० अशी कारवाई करण्यात आली आहे, असे भोर यांना सांगितले.

आरटीओच्या चार तपासणी पथकांकडून ही कारवाई सुरू आहे. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने कारवाई केली जात आहे. पुढील काळातही आरटीओची कारवाई सुरूच राहणार आहे.

– संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 09:21 IST

संबंधित बातम्या