प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला यांची शनिवारी मुंबईत परिवहन आयुक्त कार्यालयात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाने रिक्षाचा बनावट परवाना काढण्यात आल्याचे प्रकरण येवला यांना भोवले असल्याचे बोलले जात आहे.
परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या संगणकाचा पासवर्ड चोरून त्याद्वारे मुख्यमंत्र्यांच्या नावाने रिक्षाचा बनावट परवाना काढण्यात आला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंदवून त्याचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी अंतर्गत चौकशीही झाली आहे. त्यात एका कर्मचाऱ्याला निलंबितही करण्यात आले. या प्रकरणानंतर कार्यालयीन प्रमुख म्हणून येवला यांच्या बदलीची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार शनिवारी त्यांची बदली झाली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे हे परिवहन अधिकारीपदाचा तात्पुरता कार्यभार पाहणार आहेत.
येवला हे एप्रिल २०११ मध्ये पुणे कार्यालयात रुजू झाले होते. त्यांच्या कार्यकालामध्ये परिवहन कार्यालयाचा महसूल ४४० कोटींवरून ६०० कोटींवर पोहोचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rto officer arun yeola transfer to mumbai
First published on: 08-12-2013 at 02:42 IST