किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात पुण्यातील नामांकित रुबी हॉल हॉस्पिटलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट, कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी यांच्यासह १५ जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ लाखांच्या आमिषाने एका महिलेची किडनी प्रत्यारोपण केल्याचा प्रकार मार्चमध्ये उघड झाला होता. याप्रकरणात राज्य आरोग्य विभागाने यापूर्वी रुबी हॉल रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना निलंबित केलेला आहे.

डॉ. परवेज ग्रेट मॅनेजिंग ट्रस्टी, रेबेका जॉन (डेप्युटी डायरेक्टर मेडिकल सर्व्हिसेस), कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, डॉ. अभय सद्रे (कन्सलटंट नॅफ्रोलॉजिस्ट), डॉ. मुफ्त भाटी (युरोलॉजिस्ट), डॉ. हिमेश गांधी (युरोलॉजिस्ट), सुरेखा जोशी (ट्रान्सप्लांट कॉर्डीनेटर) यांच्यासह अमित साळुंखे, सुजाता साळुंखे, सारिका सुतार, अण्णा साळुंखे, शंकर पाटील, सुनंदा पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉक्टर संजोग कदम यांनी फिर्याद दिली आहे.

अमित साळुंखे या रुग्णाने सारिका सुतार या महिलेला १५ लाखांचे आमिष दाखून रुबी हॉलमध्ये किडणी प्रत्यारोपण केले. यासाठी खोटे कागदपत्रे सादर करून फसवणूक केली होती. साळुंखे याने सादर केलेली कागदपत्रे ग्राह्य धरून प्रत्यारोपण समितीने किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली. त्यांनतर ‘रुबी हॉल क्लिनिक’मध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. सुतार या महिलेला १५ लाख रुपये देण्याचे आमिष साळुंखे यांनी दाखविले. मात्र, ते न मिळाल्याने सुतार यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर हा किडणी तस्करीचा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणात आता रुबी हॉल रुग्णालयाच्या डॉक्टरांसह कायदेशीर सल्लागार यांच्यावर फसवणूक व मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये ज्या महिलांनी पैशासाठी किडनी विकली त्या महिलेला देखील आरोपी करण्यात आले आहे. किडणी प्रत्यारोपणाचा गैरप्रकार हा रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये घडल्यामुळे मॅनेजिंग ट्रस्टी हे तितकेच जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगांव पार्क पोलिस तपास करत आहेत.