ख्याल गायकीच्या अंगाने रुद्रवीणावादन करणारे पं. हिंदराज दिवेकर यांच्या रुद्रवीणा आणि सतारवादनाचा अंतर्भाव असलेल्या ‘शान्तिर्नाद’ या अल्बमचे प्रकाशन सोमवारी (१३ जानेवारी) ज्येष्ठ सारंगीवादक पं. राम नारायण यांच्या हस्ते मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिर येथे सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. उत्तरार्धात पं. दिवेकर यांच्या रुद्रवीणा आणि सतारवादनाची मैफल होणार आहे. त्यांना रुद्रवीणावादनासाठी अमोल घोडे हे पखवाजची तर, सतारवादनासाठी पद्माकर गुजर हे तबल्याची साथसंगत करणार आहेत.
श्रवण म्युझिक कंपनीने ‘शान्तिर्नाद’ या अल्बमची निर्मिती केली आहे. यामध्ये दोन रागांचा समावेश असलेल्या १५ सीडींचा संच आहे. पं. दिवेकर यांनी रुद्रवाणेवर वादन केलेल्या १८ रागांचा आणि सतारवादनाच्या १२ रागांचा समावेश आहे. भैरव, तोडी, अहिर भैरव, बैरागी भैरव, ललित, वृंदावनी सारंग, भीमपलास, मधुवंती, मारवा, पूरिया धनाश्री, भूप, यमन, केदार, बागेश्री, जोगकंस, दरबारी, मालकंस, भैरवी हे राग रुद्रवीणेवर तर, भैरव, अहिर भैरव, मियाँ की तोडी, मिश्र पहाडी, भीमपलास, यमन, जयजयवंती, मिश्र चारुकेशी, बागेश्री, खंबावती, जोगकंस आणि भैरवी हे राग पं. दिवेकर यांनी सतारवादनातून उलगडले आहेत.