पिंपरी पालिकेच्या आगामी निवडणुकांना नऊ महिन्यांचा अवकाश असला तरी, वेगवेगळ्या विषयांवरून सत्तारूढ राष्ट्रवादी आणि पिंपरी भाजप ‘आमने-सामने’ येत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे. आताही ‘गद्दार’ कोण या मुद्दय़ावरून दोन्ही पक्षांचे वाक्युद्ध रंगले आहे. राष्ट्रवादीची पदे भोगून पक्ष सोडणाऱ्या गद्दारांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली. तर, वाघेरे यांनी निष्ठेची भाषा करणे हाच मोठा विनोद असल्याचे सांगत भाजपने त्यांची खिल्ली उडवली आहे.
राष्ट्रवादीची वाल्हेकरवाडीला बैठक झाली, त्यात वाघेरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. जे पक्षाशी कधीही प्रामाणिक नव्हते, त्यांनी पक्ष सोडला म्हणून आपल्याला काही फरक पडत नाही. पक्ष सोडणारे गद्दार कार्यकर्ते सांभाळण्यापेक्षा राष्ट्रवादीचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याऱ्या कार्यकर्त्यांना ताकद देऊ. पक्षाने ज्यांना मोठे केले, त्यांनाच उपकाराची जाणीव नाही. ज्यांनी मोठे केले, त्यांचे ते होऊ शकले नाहीत तर जनतेचे काय होणार? अशा गद्दारांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका वाघेरे यांनी बैठकीत केली. तेव्हा त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, भाजप नेत्यांना ही टीका चांगलीच झोंबली. त्याला भाजपच्या वतीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे प्रतिउत्तर देण्यात आले आहे. वाघेरे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात दोनदा बंडखोरी केली आहे. विधानसभेचे तिकीट मिळावे म्हणून त्यांनी ‘मातोश्री’चे उंबरे झिजवले होते. पक्षनिष्ठेचे ढोल बडवणाऱ्यांनी लोकसभा, विधानसभेवेळी कोणाचा ‘झेंडा’ घेतला होता? सत्ता असूनही राष्ट्रवादीला जनतेचे प्रश्न सोडवता आले नाहीत. त्यामुळेच अनेकांनी पक्षातून बाहेर पडण्याचा रस्ता धरला आहे. राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू घसरत चालली असल्याने राष्ट्रवादीला पक्षनिष्ठा आठवू लागली आहे आणि म्हणूनच ते वाटेल तसे आरोप करू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruling ncp and pimpri bjp face to face on various issue ahead of municipal elections
First published on: 08-06-2016 at 04:50 IST