विद्यार्थ्यांसाठी अर्धवेळ नोकरी, गृहिणींसाठी रोजगाराचे साधन, बीपीओमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रशिक्षण, अपंगांना रोजगाराची संधी आणि घराजवळ नोकरी या ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या नोकरीच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा टाटा पॉवर्सचा ‘मन्नत’ हा ‘ग्रामीण बीपीओ प्रकल्प’ पूर्ण करीत आहे. त्यास ग्रामीण म्हणायचे कारण हा बीपीओ ग्रामीण भागात म्हणजेच खोपोली येथे आहे.
या प्रकल्पाला पुण्यातील पत्रकारांची भेट ठरवण्यात आली होती. या वेळी टाटा पॉवर्सचे उपमहाव्यवस्थापक महेश परांजपे यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. ‘मन्नत’ बीपीओ टाटा पॉवर्सच्या खोपोली येथील ऊर्जा केंद्राचा सामाजिक दायित्वाचा (सीएसआर) एक भाग म्हणून सुरू करण्यात आला होता. केंद्राच्या शेजारीच बीपीओची इमारत आहे. हा बीपीओ २४ तास सुरू असतो. सन २००९ मध्ये हा बीपीओ सुरू झाला. ‘टाटा बिझनेस सपोर्ट सव्र्हिसेस’च्या (टीबीएसएस) वतीने हा बीपीओ चालवला जातो. सुरूवातीला अगदी नगण्य कर्मचारी वर्ग असणाऱ्या या बीपीओमध्ये सध्या पूर्णवेळ आणि अर्धवेळ काम करणारे ३१० कर्मचारी आहेत. यामध्ये सुमारे ३० टक्के विद्यार्थी आहेत, तर एकूण ४० टक्के महिला आहेत. येथे काम करण्यासाठीची पात्रताही केवळ बारावी उत्तीर्ण आहे.
येथे काम करणारे कर्मचारी खोपोली, मुळशी आणि मावळ भागातील आहेत. तेथील लोकांना बीपीओच्या माध्यमातून रोजगाराचे चांगले साधन उपलब्ध झाले आहे. याठिकाणी काम करणारे विद्यार्थी शिकता शिकता कमवून कुटुंबाला आर्थिक साहाय्य करीत आहेत. या ठिकाणी अपंगांनाही संधी दिली जाते. संध्या गोखले एका हाताने अधू आहे; पण गेली तीन वर्षे ती या बीपीओमध्ये काम करते आहे. ‘येथे काम करायला लागल्यापासून माझा राग खूप कमी झाला आहे,’ असे ती गमतीने सांगते. एजंट म्हणून कामाला सुरूवात केलेले अनेक जण आता याच ठिकाणी टिम लिडर म्हणून काम करीत आहेत. ‘मन्नत’मध्ये कामाची सुरक्षितता तर आहेच, शिवाय नोकरीसाठी कुटुंबापासून लांब जावे लागत नाही. म्हणून आम्ही येथेच काम करणार आहोत,’ असे अनेकांनी सांगितले.
 
६० टक्के दूरध्वनी मराठीमधून
हे कॉल सेंटर टाटा डोकोमोच्या ग्राहकांसाठी आहे. याठिकाणी येणाऱ्या दूरध्वनींपैकी ६० टक्के दूरध्वनी मराठी भाषकांचे असतात. तसेच ३० टक्के हिंदीमधील तर केवळ १० टक्के इंग्रजीमधून येतात. यामुळे कर्मचाऱ्यांनाही भाषेची अडचण जाणवत नाही.
 
कर्मचाऱ्यांमध्ये गृहिणींचाही समावेश
‘मन्नत’ बीपीओमध्ये अनेक गृहिणीही कार्यरत आहेत. कर्मचारी वर्गातील महिलांमध्ये गृहिणींचे प्रमाण ३२ टक्के आहे. या गृहिणी बीपीओमध्ये पूर्णवेळ काम करतात. त्याही खोपोली आणि आसपासच्या भागातील आहेत.