एसटीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विना अपघात सुरक्षितता मोहिमेच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जात असताना एसटीचा अपघात टाळण्यासाठी नागरिकांकडेही काही सूचना किंवा प्रस्ताव असल्यास त्याचे स्वागत केले जाणार आहे.
नागरिकांकडे काही उपयुक्त सूचना, प्रस्ताव असल्यास त्यांनी महामंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसटीच्या पुणे विभागाचे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी केले. सध्या एसटीच्या वतीने विना अपघात सुरक्षितता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये सर्व बसस्थानक, आगार, विभागीय, प्रादेशिक व मध्यवर्ती कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले आहेत. अपघात टाळण्यासाठी घेण्याच्या दक्षतेबाबत सूचना देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे मार्ग तपासणी पथक व दक्षता पथकातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाहक कर्तव्यावर असताना त्याने मद्यपान करू नये, मोबाईलचा वापर करू नये, त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन करू नये, याकडे लक्ष पुरविले जात आहे.
चालकांसाठी घेतल्या जाणाऱ्या नेहमीच्या प्रशिक्षण वर्गाशिवाय खास बैठका घेऊन चालक, वाहकांना अनुभव सांगण्याची संधी देण्यात येत आहे. त्यातून त्यांना येणाऱ्या अडचणी समजावून घेत त्याचे निवारण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सुरक्षिततेबाबत बसस्थानके, नियंत्रण कक्ष, कर्मचारी विश्रांतीगृहे व इतर महत्त्वाच्या ठिकाणी भित्तिपत्रके प्रदर्शित करण्यात आली आहेत. नागरिकांनाही हा मोहिमेमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अपघात टाळण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठी नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत.