राज्यातील आयपीएस आणि सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्या रखडलेल्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. पुणे शहरातील पाच आयपीएस अधिकाऱ्यांबरोबरच इतर ८८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये शहरातील २६ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. पुणे शहराच्या सहआयुक्तपदी औरंगाबादचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून बदल्या रखडल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाने शनिवारी रात्री काढले. पुणे शहराचे सहपोलीस आयुक्त संजीव कुमार सिंघल यांची बदली महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या संचालक पदावर करण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेखला यांची पदोन्नतीने अमरावतीच्या पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे, रामनाथ पोकळे, मकरंद रानडे यांच्या बदल्या झाल्या आहेत. डॉ. मेखला यांच्या जागेवर गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) उपमहानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाच सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये प्रकाश घार्गे, प्रसाद हसबणीस, शिवाजी शेलार, दीपक हुंबरे यांचा समावेश आहे.
या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच शहरातील तब्बल २६ पोलीस निरीक्षक आणि ५२ सहायक पोलीस निरीक्षकांच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. तर, पुण्यात बाहेरून १५ पोलीस निरीक्षक बदलून आले आहेत. पुण्यातून बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये भानुप्रताप बर्गे, सतीश गोवेकर, किशोर जाधव, राम पठारे, शिवाजी तांबारे, कमलाकर ताकवडे, अजय कदम, मोहन विधाते, भीमराव टेळे, विश्वनाथ घनवट, बाजीराव मोहिते, नंदकिशोर भोसले-पाटील, पोपट लोखंडे, पंढरीनाथ पाटील, अर्जुन सकुंडे, सुनिल दरेकर, शिवाजी कांबळे, शैलेद्र शिंदे, संजय कार्येकर, रघुनाथ जाधव, फारूक काझी, मनोहर चिखले, नामदेव सुर्वे, बाळासाहेब गाडे, नितीन थोरात यांचा समावेश आहे.