सुंद्रीवादनाची ८५ वर्षांची परंपरा जतन करणाऱ्या घराण्यातील भीमण्णा जाधव यांचे वादन.. चित्रपटसृष्टी गाजविलेले प्रसिद्ध पाश्र्वगायक सुरेश वाडकर यांची शास्त्रीय गायनाची मैफल.. बासरी, सॅक्सोफोन आणि पखवाजच्या साथीने होणारा गुंदेचा बंधू यांचा ध्रुपद संच.. उस्ताद बहाउद्दीन डागर यांचे रुद्रवीणावादन.. ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम यांचे पुत्र अंबी सुब्रमण्यम यांचे कर्नाटक शैलीतील व्हायोलिनवादन.. जुन्या आणि नव्या पिढीतील कलाकारांच्या कलाविष्काराचा मिलाफ यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात रसिकांना अनुभवता येणार आहे.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे ११ ते १४ डिसेंबर या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे ६२ वे वर्ष आहे. महोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांची सुरूवात दुपारी साडेतीन वाजता होणार असून रात्री दहापर्यंत चालेल. शेवटच्या दिवशी रविवारी सकाळी आठ ते बारा आणि दुपारी चार ते रात्री दहा (परवानगी मिळाल्यास रात्री बारापर्यंत) अशी दोन सत्रे होणार आहेत, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
संपूर्ण महोत्सवासाठी सीझन तिकिटे उपलब्ध करुन दिली जाणार असून खुर्चीसाठी अडीच हजार रुपये, तर भारतीय बैठकीसाठी ३५० रुपये असा तिकीट दर असेल. भारतीय बैठकीसाठी दर दिवसाची तिकिटेदेखील उपलब्ध करून दिली जाणार आहेत. महोत्सवाची तिकिट विक्री ४ डिसेंबरपासून सुरू होत असून शिरीष ट्रेडर्स (कमला नेहरु पार्क), नावडीकर म्युझिकल्स (कोथरूड), दिनशॉ आणि कंपनी (लक्ष्मी रस्ता) आणि बेहरे बंधू आंबेवाले (शनिपार) येथे तिकिटे उपलब्ध होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महोत्सवातील मैफली
गुरुवार ११ डिसेंबर
– भीमण्णा जाधव (सुंद्रीवादक)
– सानिया पाटणकर (गायन)
– दिवाकर-प्रभाकर कश्यप बंधू (सहगायन)
– पं. शिवकुमार शर्मा (संतूर)
– पं. जसराज (गायन)
शुक्रवार १२ डिसेंबर
– रमाकांत गायकवाड (गायन)
– सुमित्रा गुहा (गायन)
– आनंद भाटे (गायन)
 – डॉ. सुचेता भिडे-चापेकर (भरतनाटय़म)
– पं. अजय पोहनकर (गायन)
शनिवार १३ डिसेंबर
– श्रीवाणी जडे (गायन)
– मंजू मेहता (सतार) आणि पाथरे सारथी (सरोद)
– श्रीनिवास जोशी (गायन)
– रमाकांत-उमाकांत गुंदेचा बंधू (ध्रुपद संच)
– पं. उल्हास कशाळकर (गायन)
रविवार १४ डिसेंबर
सत्र पहिले
– धनंजय हेगडे (गायन)
– उस्ताद बहाउद्दीन डागर (रुद्रवीणा)
– पंडिता मालिनी राजूरकर (गायन)
सत्र दुसरे
– अंबी सुब्रमण्यम (व्हायोलिन)
– मीता पंडित (गायन)
– सुरेश वाडकर (गायन)
– पूर्बायन चटर्जी (सतार)
– डॉ. प्रभा अत्रे (गायन)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sawai gandharv bhimsen mahotsav
First published on: 29-11-2014 at 03:17 IST