नव्याने होऊ घातलेली खरेदी वादात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वपक्षीय नगरसेवकांच्या हौसेखातर गेल्या पाच वर्षांत तब्बल २५ हजार बाकांची खरेदी महापालिकेने केली आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने शहरात बाक बसविण्यात आलेले असताना पुन्हा सात हजार बाकांची नव्याने होऊ घातलेली खरेदी वादात सापडली आहे. त्याबरोबरच पाच वर्षांतील २५ हजार बाक कुठे गेले, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीनुसार प्रतीनग पाच हजार ५९८ रुपये या दराने सात हजार बाकांची खरेदी प्रशासनाकडून करण्याचे प्रस्तावित आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. नागरिकांच्या कररूपातून जमा झालेल्या पैशातून कचरा डबे, कापडी पिशव्यांसह अन्य वस्तूंचे वाटप नगरसेवक स्वप्रसिद्धीसाठी करत असल्याचे आणि त्यासाठी कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ९ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर या खरेदीवर टीका झाली. होऊ घातलेल्या या खरेदीला  शहरातील स्वयंसेवी संस्थांनीही विरोध दर्शविला आहे.

गेल्या पाच वर्षांत महापालिकेने नगरसेवकांच्या आग्रहापोटी १५ कोटी रुपये खर्च करून २५ हजार बाक शहरात बसविले. मात्र हे बाक गेले कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने बाकांची खरेदी झालेली असतानाही नव्याने सात हजार बाक खरेदीचे कारण काय, अशी विचारणा सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.

नव्याने खरेदी नको

कररूपातून जमा झालेल्या पैशांची सर्वाधिक उधळपट्टी नगरसेवक बाक बसवण्यासाठी करत असल्याची बाब काही वर्षांपूर्वी परिवर्तन या संस्थेने पुढे आणली होती. या संस्थेकडून नगरसेवकांचे प्रगती पुस्तक तयार करण्यात आले होते. त्यावेळी महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसारच बाक खरेदीची ही माहिती जाहीर करण्यात आली होती. पाच वर्षांतील खरेदी पाहता दर चौरस किलोमीटर मागे १०२ बाक बसविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नवीन बाकांवर उधळपट्टी करू नये, अशी मागणी परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष तन्मय कानिटकर यांनी महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव आणि स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांच्याकडे केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School bench scam in pune
First published on: 12-02-2019 at 03:07 IST